खाकीतल्या रणरागिणी रायफलींची कमाल दाखविणार; मुंबई पोलीस दलात महिला पोलिसांचे सायलेंट आर्म ड्रिल पथक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> आशीष बनसोडे 

मुंबई पोलिसांच्या शिरपेचात आता आणखी एक मानाचा तुरा रोवला जाणार आहे. महिला पाइप बॅण्डनंतर आता खाकीतल्या रणरागिणी रायफलींची कमाल दाखवणार आहेत. मुंबई पोलीस दलात पहिलेच महिला पोलिसांचे सायलेंट आर्म ड्रिल पथक  तयार होत आहे. त्यामुळे पुरुष पोलिसांच्या खांद्याला खांदा लावून महिला पोलीस संचलनामध्ये सायलेंट आर्म ड्रिल करताना दिसणार आहेत.

देवेन भारती यांनी मुंबई पोलीस आयुक्तपदाची सूत्रे हाती घेतल्यापासून पोलीस दलात आमूलाग्र बदल घडविण्यास सुरुवात केली आहे. विशेष म्हणजे महिला पोलिसांच्या कर्तृत्वाची दखल घेत ते महिला पोलीस अधिक सक्षम करण्यावर भर देत आहेत. आधी त्यांनी कठीण समजले जाणारे महिलांचे पाइप बॅण्ड पथक सुरू केले. 47 जणींची या पथकात निवड केल्यानंतर या अंमलदारांनीदेखील आयुक्तांचा विश्वास सार्थ करून दाखवला. महिला अंमलदारांकडून  उत्कृष्ट प्रतिसाद मिळत असल्याने आयुक्तांनी पुढचे पाऊल टाकत आता मुंबई पोलीस दलात पहिल्यांदाच महिला अंमलदारांचे सायलेंट आर्म ड्रील पथक सुरू केले आहे. यात 32 खाकीतल्या रणरागिनींचा समावेश असून नायगावच्या परेड मैदानात त्यांचा जोरदार सराव सुरू आहे. येत्या 28 एप्रिल रोजी मुंबई पोलिसांनी आयोजित केलेल्या राज्यस्तरीय पोलीस क्रीडा स्पर्धेच्या संचलनात या रणरागिनी सायलेंट आर्म ड्रिलचे कसब दाखविणार आहेत.

32 पुरुषांचेही पथक

महिलांबरोबर 32 पुरुषांचेदेखील सायलंट आर्म ड्रिल पथक तयार करण्यात आले आहे. प्रजासत्ताकदिनी दिल्लीच्या विजयपथावर सायलेंट आर्म ड्रिलचा थरार दरवर्षी पाहायला मिळतो. आता तसाच आर्मड्रिलचा थरार मुंबई पोलिसांच्या रणरागिनी करून दाखविताना अनुभवता येणार आहे.