
नवी मुंबईत धोकादायक इमारतींचा सुरू झालेला पुनर्विकास आणि एफएसआय वाढल्यामुळे सर्वत्र नागरीकरण जोरदार सुरू आहे. या पार्श्वभूमीवर शहरातील रस्ते रुंद करण्यावर भर दिला जात असला तरी पनवेल महापालिकेने खारघर वसाहतीमधील रस्त्याची रुंदी कमी करण्याचा कारनामा केला आहे. महापालिकेच्या या गजब कारभारावर सर्वच स्तरांतून आता टीका होऊ लागली आहे.
खारघर येथील सेक्टर ७ येथील हिरानंदानी परिसरासमोरील सध्याची परिस्थिती अत्यंत धक्कादायक आहे. ज्या ठिकाणी वाढत्या लोकसंख्येमुळे आणि वाहतुकीच्या ताणामुळे रस्ता रुंद करणे अपेक्षित होते त्या ठिकाणी उलट रस्त्याची रुंदी कमी करण्यात आली आहे. पूर्वी नागरिकांना चालण्यासाठी, वाहन चालवण्यासाठी पुरेसा मोकळा रस्ता तिथे उपलब्ध होता. मात्र आता गार्डन व फुटपाथच्या नावाखाली रस्त्याचा मोठा भाग व्यापण्यात आला आहे. यामुळे वाहतूककोंडीची समस्या वाढत आहे. पादचारी व उधळपट्टीची चौकशी करा.
रस्ता रुंद करण्याऐवजी त्याची रुंदी कमी करणे हे नागरिकांच्या सोयीऐवजी अडचणी वाढवणारे आहे. खारघरमधील खऱ्या गरजेच्या ठिकाणी जसे की खराब रस्ते, ड्रेनेज समस्या, पाणीपुरवठा यावर खर्च करणे आवश्यक आहे. मात्र येथे अनावश्यक कामांवर लाखो, कोट्यवधी रुपयांचा अपव्यय होत असल्याचे दिसत असून याप्रकरणी सखोल चौकशी करण्याची मागणी नंदू वारुंगसे यांनी केली आहे.
वाहनचालकांच्या सुरक्षेला धोका निर्माण झाला आहे. आपत्कालीन वाहनांना मार्ग मिळणे कठीण झाले आहे. ही कामे कोणत्या नियोजनानुसार आणि कोणत्या गरजेपोटी करण्यात आली, हा मोठा प्रश्न शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे खारघर उपशहरप्रमुख नंदू वारुंगसे यांनी पालिका प्रशासनाला विचारला असून या कामांवर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.





























































