
अनेकदा कामामुळे कामगारांना सुट्टय़ा घ्यायला मिळत नाहीत. त्यांच्या बऱ्याच सुट्टय़ा शिल्लक राहतात. मात्र नवीन कामगार कायद्यानुसार, शिल्लक रजा आता वाया जाणार नाही. कारण दरवर्षी कामगारांना त्यांच्या शिल्लक रजांचे पैसे मिळणार आहेत. म्हणजेच लिव एन्कॅशमेंट होणार आहे. पूर्वी कर्मचाऱ्यांना त्यांच्या शिल्लक रजेचे पैसे मिळवण्यासाठी नोकरी सोडण्याची, निवृत्त होण्याची किंवा कामावरून काढून टाकण्याची वाट पाहावी लागत असे. मात्र आता नव्या कायद्यानुसार कामगारांना दिलासा मिळणार आहे. आता ते दरवर्षी त्यांच्या अतिरिक्त रजेचे रोखीकरण करू शकतील. अर्जित रजेसाठी (अर्न लिव) पात्र होण्याकरिता कर्मचाऱ्यांना आता जास्त काळ वाट पाहावी लागणार नाही. जुन्या कारखाना कायद्यानुसार 240 दिवस सलग काम करणे अनिवार्य होते. नवीन कामगार संहितेने ही मर्यादा केवळ 180 दिवसांपर्यंत कमी केली आहे.
कोणत्या कर्मचाऱ्यांना फायदा?
नवीन कामगार संहितेचे हे आकर्षक फायदे सर्वांसाठी उपलब्ध नाहीत. हे प्रामुख्याने अशा कामगारांसाठी तयार केले आहे जे शारीरिक, अकुशल, कुशल, तांत्रिक, परिचालन किंवा लिपिकीय कामे करतात आणि ज्यांचा मासिक पगार 18,000 पेक्षा कमी आहे. जर एखादा कर्मचारी दरमहा 18,000 पेक्षा जास्त कमावणारा सुपरवायजर असेल किंवा व्यवस्थापकीय किंवा प्रशासकीय पदावर असेल, तर त्यांना या संहितेंतर्गत हे विशिष्ट फायदे मिळणार नाहीत.
n कर्मचारी आता जास्तीत जास्त 30 दिवसांची रजा पुढील वर्षासाठी पुढे नेऊ शकतात. जर एखाद्या कर्मचाऱ्याने 30 दिवसांपेक्षा जास्त रजा जमा केली, तर ते त्या अतिरिक्त रजेसाठी भरपाईचा दावा करू शकतात. शिवाय वर्षाच्या शेवटी कर्मचारी त्यांच्या सर्व जमा झालेल्या रजेचे रोख रकमेत रूपांतर करण्याचा दावा करू शकतात.
रजा पॅरी फॉरवर्ड होणार
अनेकदा असे घडते की, एखादा कर्मचारी रजेसाठी अर्ज करतो, परंतु कंपनी किंवा बॉस कामाच्या मर्यादांचे कारण देऊन तो अर्ज नाकारतात. जुन्या पद्धतीनुसार, याचा अर्थ कर्मचाऱ्याची रजा वाया गेली असती. नवीन कामगार संहिता 2025 ने हा अन्याय पूर्णपणे दूर केला आहे. त्यात एक अत्यंत महत्त्वाची सुरक्षा जोडली आहे, जर एखाद्या कर्मचाऱ्याने रजेची विनंती केली आणि मालकाने ती नाकारली, तर ती रजा रद्द होणार नाही. त्याऐवजी ती रजा पॅरी फॉरवर्ड होईल. म्हणजे पुढच्या वर्षीच्या रजेत जोडली जाईल.


























































