
‘मुंबईकरांची जीवनवाहिनी’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या लोकलसेवेच्या विस्कळीत वेळापत्रकाचा प्रश्न चिंतेचा विषय बनला आहे. सोमवारी आठवड्याच्या पहिल्या दिवशी नोकरदारांना लोकलसेवेच्या विलंबाचा मनस्ताप सहन करावा लागला. पश्चिम, मध्य व हार्बर अशा तिन्ही रेल्वे मार्गांवर दिवसभर बहुतांश गाड्या उशिराने धावल्या. मध्य रेल्वेवर सायंकाळी कल्याण स्थानकातील सिग्नल यंत्रणेत तांत्रिक बिघाड झाला आणि या मार्गावरील लोकल गाड्यांचा 30 मिनिटांहून अधिक वेळ खोळंबा झाला. तेथील बिघाडाचा मार्गावरील संपूर्ण लोकलसेवेवर परिणाम झाला.
गेल्या महिन्यापासून पश्चिम रेल्वेचा वक्तशीरपणा पूर्णपणे बिघडला आहे. अनेक ठिकाणी लोकल फेऱ्यांची वेगमर्यादा ताशी 30 किमीपर्यंत कमी करण्यात आली आहे. त्याचा परिणाम होऊन संपूर्ण वेळापत्रक कोलमडत आहे. सोमवारी सकाळी आणि सायंकाळच्या सुमारास विस्कळीत वेळापत्रकाचा मोठा मनस्ताप प्रवाशांना सहन करावा लागला. सायंकाळी चर्चगेटहून सुटणाऱ्या अनेक गाड्या काही वेळ प्लॅटफॉर्मवर गाडीची वेळ वा गंतव्य स्थानकाची माहिती न देताच उभ्या करून ठेवल्या जात होत्या. त्यामुळे प्रवाशांत संभ्रमाची परिस्थिती निर्माण होत होती.
एक गाडी बराच वेळ चर्चगेट स्थानकाच्या प्लॅटफॉर्म क्रमांक 2 वर उभी केली होती. सुरुवातीला ती गाडी यार्डमध्ये जाणार असल्याची उद्घोषणा केली जात होती. नंतर ती गाडी अचानक ‘गोरेगाव स्लो’ असल्याचे इंडिकेटरवर दाखवले आणि गाडी चालवण्यात आली. अशाप्रकारचा गोंधळ रोजच सुरू असल्याची नाराजी गोरेगाव येथील संजय चोरगे यांनी व्यक्त केली. दुसरीकडे कल्याण स्थानकात सिग्नल यंत्रणेतील तांत्रिक बिघाडामुळे मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली होती. कसारा लोकल तब्बल 30 मिनिटांहून अधिक वेळ स्थानकात उभी केली होती. दरदिवशी सकाळी 15 ते 25 मिनिटांच्या विलंबाला तोंड देणाऱया प्रवाशांना सोमवारी सिग्नल यंत्रणेतील बिघाडाची डोकेदुखी सहन करावी लागली.


























































