आखाती देशात मृत्यू झालेल्या हिंदुस्थानी नागरिकाच्या मृतदेहाची डीएनए चाचणी करा, कुटुंबीयांची हायकोर्टात याचिका

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

ओमानच्या समुद्रात तेलवाहू जहाजावर झालेल्या ड्रोन हल्ल्यात मृत्यू पावलेल्या खलाशाच्या मृतदेहाची ओळख पटवण्यासाठी डीएनए चाचणी करा, अशी मागणी खलाशाच्या कुटुंबीयांनी केली आहे. याची दखल घेत हायकोर्टाने शिपिंग विभागाच्या उपमहासंचालकांना उत्तर देण्याचे आदेश दिले आहेत.

पश्चिम आशियातील सुरू असलेल्या संघर्षादरम्यान 4 मार्च रोजी स्फोटकांनी भरलेला ड्रोन ओमानच्या समुद्रातील एमटी एमकेडी व्योम या तेलवाहू जहाजावर पडला. या हल्ल्यात बोटीवर खलाशी असलेले 25 वर्षीय दीक्षित सोलंकी ठार झाले. महिना उलटूनही पार्थिव ताब्यात न मिळाल्याने दीक्षितचे वडील अमृतलाल आणि बहीण मिताली यांनी ज्येष्ठ वकील सतीश तळेकर व अ‍ॅड. माधवी अय्यपन यांच्यामार्फत हायकोर्टात याचिका दाखल केली आहे. या याचिकेवर आज सोमवारी मुख्य न्यायमूर्ती श्री चंद्रशेखर आणि न्यायमूर्ती गौतम अनखड यांच्या खंडपीठासमोर सुनावणी घेण्यात आली. त्यावेळी मृत व्यक्तीच्या कुटुंबीयांच्या वतीने न्यायालयाला सांगण्यात आले की, रविवारी 5 एप्रिल रोजी त्याचे अवशेष हिंदुस्थानात आणण्यात आले, परंतु ते पूर्ण शरीर नसून हाडांचे केवळ 4-5 जळलेले तुकडे आहेत. अवशेषांची स्थिती पाहता ते दीक्षितचेच आहेत की नाहीत याची ओळख पटवणे अशक्य आहे. त्यामुळे त्याची डीएनए चाचणी गरजेची आहे, जेणेकरून खात्री पटल्यानंतरच कुटुंबीय अंतिम संस्कार करू शकतील. हायकोर्टाने या युक्तिवादाची दखल घेत शिपिंग विभागाच्या उपमहासंचालकाना याबाबत भूमिका स्पष्ट करण्याचे आदेश देत सुनावणी उद्या मंगळवार 7 एप्रिलपर्यंत तहकूब केली.