
पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांनी कोलकाता शहरावर हल्ला करण्याची धमकी दिल्यानंतर हिंदुस्थानचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी पाकिस्तानला सडेतोड प्रत्युत्तर दिले आहे. पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान बोलताना राजनाथ सिंह यांनी पाकिस्तानला त्यांच्या इतिहासाची आठवण करून दिली. पाकिस्तानने 55 वर्षांपूर्वी, 1971 मध्ये एक चूक केली होती आणि त्याची किंमत दोन तुकड्यांमध्ये विभागले जाऊन चुकवावी लागली. यावेळी पाकिस्तानने कोणतेही कृत्य करण्यापूर्वी किमान 100 वेळा विचार करावा, आता बंगालकडे पाहिल्यास त्याचे किती तुकडे होतील याची कल्पनाही करता येणार नाही असा इशारा राजनाथ सिंह यांनी दिला आहे.
पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांनी सियालकोटमध्ये पत्रकारांशी बोलताना असे म्हटले होते की, हिंदुस्थानने भविष्यात कोणतीही चुकीची कारवाई केल्यास पाकिस्तान कोलकाता शहरावर हल्ला करून त्याला प्रत्युत्तर देईल. आसिफ यांचे हे विधान राजनाथ सिंह यांच्या त्या वक्तव्याला उत्तर म्हणून आले होते, ज्यात सिंह यांनी हिंदुस्थानच्या विरोधात जाणाऱ्या कोणत्याही देशाला अभूतपूर्व कारवाईला सामोरे जावे लागेल असे म्हटले होते.
दोन्ही देशांमधील तणावाच्या पार्श्वभूमीवर राजनाथ सिंह यांनी ‘ऑपरेशन सिंदूर’चाही उल्लेख केला. गेल्या वर्षी 22 एप्रिल रोजी झालेल्या पहलगाम हल्ल्यानंतर हिंदुस्थानने पाकिस्तानविरुद्ध हे ऑपरेशन सुरू केले होते. या कारवाईत पाकिस्तानचे मोठे नुकसान झाले होते आणि केवळ चार दिवसांच्या संघर्षानंतर पाकिस्तानला गुडघे टेकून हिंदुस्थानने शस्त्रसंधीची विनंती करावी लागली होती. राजनाथ सिंह यांच्या या विधानामुळे सीमेवर आणि राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली असून, हिंदुस्थानने पुन्हा एकदा आपल्या आक्रमक धोरणाची प्रचिती दिली आहे.
























































