
मराठी मनोरंजन सृष्टीतून एक दु:खद बातमी समोर आली आहे. प्रसिद्ध मराठी अभिनेता आणि ‘तू ही रे माझा मितवा’ फेम शेखर फडके याच्या वडिलांचे, विजयकुमार फडके यांचे दुःखद निधन झाले आहे. सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत त्याने याबाबत माहिती दिली आहे.
विजयकुमार फडके यांचे निधन 6 एप्रिल 2026 रोजी पहाटे 2 वाजता झाले. योगायोगाने याच दिवशी त्यांचा 77 वा वाढदिवस होता. वडिलांच्या निधनाची माहिती देताना शेखर यांनी अत्यंत भावुक पोस्ट लिहिली असून, वडिलांच्या पुढील प्रवासासाठी सर्वांनी प्रार्थना करावी, असे आवाहन त्यांनी केले आहे. विजयकुमार फडके यांच्या पश्चात शेखर, त्यांचा भाऊ शिरीष फडके आणि संपूर्ण परिवार असा मोठा परिवार आहे. त्यांच्या अचानक जाण्याने फडके कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
View this post on Instagram
शेखर याने आपल्या इंस्टाग्राम पोस्टमध्ये वडिलांचा फोटो शेअर करत ही दुःखद बातमी दिली. त्यात त्याने लिहीले की, ‘दुःखद बातमी…आज दिनांक 6 एप्रिल रोजी माझ्या बाबांना,विजयकुमार फडके यांना पहाटे 2 वाजता देवाज्ञा झाली…बाबा 76 वर्षांचे होते…आणि आजच त्यांचा वाढदिवस होता (6 एप्रिल 1949- 6 एप्रिल 2026)’ ‘त्यांच्या पुढच्या प्रवासा साठी, तुमची प्रार्थना उपयोगाची पडणार, यासाठी तुम्हाला कळवत आहे….(मी शेखर फडके आणि माझा भाऊ शिरीष फडके आणि परिवार)’ असं शेखरनं पुढे म्हटलं आहे.
शेखर फडके यांनी आजवर अनेक मराठी चित्रपट आणि मालिकांमध्ये आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला आहे. सध्या ते स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘तू ही रे माझा मितवा’ या मालिकेत ‘अविनाश’ ही भूमिका साकारत आहेत. त्यांच्या या भूमिकेला प्रेक्षकांकडून मोठी पसंती मिळत असतानाच, त्यांच्या वैयक्तिक आयुष्यातील या दुःखद घटनेमुळे मराठी कलाविश्वातील अनेक कलाकारांनी आणि चाहत्यांनी सोशल मीडियाद्वारे त्यांना सांत्वन दिले आहे.




























































