विकासकामांच्या खर्चानुसारच पक्षांना मिळणार विकास निधी, स्थायीच्या सदस्यांचा अध्यक्षांकडे पत्रप्रपंच

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

अर्थसंकल्पातून स्थायी समितीला 800 कोटींचा निधी मिळाला असला तरी पक्षांनी सुचवलेल्या विकासकामांच्या खर्चानुसारच निधी मिळणार आहे. हा विकासनिधी मिळवण्यासाठी स्थायी समिती सदस्यांनी अध्यक्षांकडे निधीच्या मागणीची पत्रे सादर केली आहेत. मात्र कुठल्या पक्षाला किती निधी मिळणार हे अद्याप स्पष्ट झाले नसून येत्या दोन ते तीन दिवसांत स्थायी समिती अध्यक्ष याबाबत घोषणा करण्याची शक्यता आहे.

मुंबईतील विकासकामांसाठी अर्थसंकल्पातून दरवर्षी स्थायी समितीला ठराविक निधी दिला जातो. यानुसार सोमवारी स्थायी समितीत 80 हजार 952 कोटींच्या अर्थसंकल्पाला मंजुरी देण्यात आल्यानंतर 800 कोटींचा निधी प्रशासनाकडून उपलब्ध करून देण्यात आला आहे. दरवर्षी 700 कोटींपर्यंत मिळणारा निधी यावर्षी 100 कोटींनी वाढीव मिळाल्याने सर्वच पक्षांकडून समाधान व्यक्त केले जात आहे.

पक्षपात करू नका

मुंबईकरांना सेवा-सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी सर्वच नगरसेवकांना विकास निधीची आवश्यकता असते. त्यामुळे सत्ताधाऱ्यांनी विरोधकांनाही आवश्यक प्रमाणात निधी द्यावा, कोणताही पक्षपात करू नये, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

असे होणार अंदाजित वाटप

मुंबईतील 227 नगरसेवकांना प्रत्येकी एक कोटी रुपये विकास निधी यावेळीही मिळणार आहे. तर उर्वरित 463 कोटी रुपये निधीपैकी महापौरांसाठी 100 ते 150 कोटी रुपयाचा निधी दिला जाण्याची शक्यता आहे.

तर स्थायी समिती अध्यक्षांकडे 313 कोटीचा निधी शिल्लक राहणार आहे. या 313 कोटी रुपयांमधून पक्षांना निधी दिला जाईल. मात्र निधी देताना सदस्यांनी सुचवलेल्या कामाचा खर्च पाहूनच निधी मिळण्याची शक्यता आहे.