
>> वैश्विक [email protected]
आपण माणसांच्या, त्यांच्या अभिव्यक्तीच्या स्वातंत्र्याला महत्त्व देतो. आजकाल प्राण्यांच्या स्वातंत्र्याची चर्चा होत असते. एकूणच सजीवांनी सुखेनैव जगावे असा अगदी संतसाहित्यापासून मिळालेला सर्व जिवाच्या उत्कर्षाचा विचार सांगितला जातो, तो योग्यच आहे. परंतु ज्या निर्जीव गोष्टी विराट विश्वात आहेत, त्यांचे नैसर्गिक नियम आपोआप घडत गेले आहेत. त्याचाच शोध खूप सखोल संशोधन करून आपल्यापुढे आणण्याचा प्रयत्न खगोलतज्ञ करत असतात.
पृथ्वीपलीकडे इतर कुठे सजीव असतील तर त्यांचा निश्चित पत्ता आपल्याला लागलेला नाही. कधी कुठे सूक्ष्मजीव सापडला तरी त्याची बातमी होते. याचा अर्थ विश्वात अन्यत्र सजीव आणि आपल्यासारखे किंवा आपल्यापेक्षा अधिक प्रगत-सजीव असण्याची भरपूर शक्यता आहे. याचे कारण म्हणजे आपल्याच आकाशगंगेत 200 अब्ज तारे आहेत. त्यातले काही आपल्या सूर्यापेक्षा लहान तर काही मोठे. त्यापैकी अनेकांभोवती विशाल ग्रहमालाही आहेत. हळूहळू आपल्याला या ग्रहमालांचा थोडाथोडा शोध लागतोय. अती शक्तिशाली ‘जेम्सवेब’सारख्या अवकाशी दुर्बिणी विश्वातील पसारा आणि विश्वजन्माच्या जवळच्या काळातील वैश्विक घडामोडी थेट फोटोंच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचवत आहेत.
आधी उल्लेख केला तसे तारे आणि त्यांच्या ग्रहमाला तपासून एखादा ग्रह एखाद्या ताऱ्याच्या ‘हॅबिटेबल झोन’ किंवा वसतीयोग्य पट्टय़ात येतो का ते पाहिलं जातंय. विश्वास दूरस्थ तारकासमूहात (शौरी किंवा हर्क्युलससारख्या) रेडिओ संदेश पाठवले जातायत आणि व्हॉएजर-1 यान तर सूर्यमाला ओलांडून 1 प्रकाशदिवस किंवा 26 अब्ज किलोमीटरचा प्रवास येत्या नोव्हेंबरमध्ये पूर्ण करण्याच्या तयारीत आहे. आपल्याला आणखी कुठल्या ‘जीवसृष्टी’चा वगैरे शोध घ्यायचा असेल तर एखादा तारा नि त्याभोवतीची ग्रहमाला असंच मॉडेल (आपल्या अस्तित्वावरून) शोधावं लागणार. एखाद्या ग्रहाच्या अगदीजवळ असणारा आणि सतत धगधगणारा ग्रह सजीवांना जगू देणार नाही. तीच स्थिती त्या ताऱ्यापासून खूप दूर असलेल्या अतिशीत ग्रहाची. तिथे कदाचित काही सूक्ष्मजीव (मायक्रोब) सापडू शकतील, पण आपल्याला ‘काय, कसं काय?’ म्हणू शकणारा सजीव शोधायचा तर एखाद्या ताऱ्याच्या ‘हॅबिटेबल’ झोनमधल्या सुरक्षित ग्रहाचा मागोवा घ्यायला हवा.
पण समजा काही ग्रह कुठल्या एका ताऱ्याशी, आपल्या ग्रहमालेसारखे ‘बांधील’ राहायला तयार नसतील तर? म्हणजे त्यांनी तसं स्वतः ठरवणं शक्य नाही, पण निसर्गतःच ते एकांडे शिलेदार असू शकतात. मग असे किती ग्रह असतील? कुठे असतील? कसे असतील? त्यांच्या एकटेपणाला किंवा मुक्त स्वातंत्र्याला कधी बाधा येत असेल का? एखाद्या प्रभावी ताऱ्याचं गुरुत्वाकर्षण त्यांना ‘पकडून’ स्वतःभोवती फिरायला लावत असेल का? असे कितीतरी प्रश्न या लेखात अशाच एकांड्या किंवा ‘स्वतंत्र’ ग्रहांविषयी माहिती घेऊ या. इंग्लिशमध्ये त्यांना ‘रोग’ म्हणजे निरुद्देश भटके असं म्हणतात. ‘रोग’चा दुसरा अर्थ बदमाश असाही होतो. मुळात ते ग्रह म्हणजे भावभावना असलेली माणसे नव्हेत. त्यांना ‘रोग’ म्हणणे तितकेस उचित नाही. भटके या अर्थी ठीक आहे, परंतु ‘स्वतंत्र’ का नाही म्हणायचं. काही वर्षांपूर्वी सूर्याच्या करोना किंवा प्रभामंडलासारखे ‘स्पाइक’ आहेत म्हणून त्या व्हायरसचं नाव करोना (!) ठेवलं गेलं. नुसतं थॉर्नी (काटेरी) म्हटलं असतं तरी चाललं असतं… जाऊ द्या. आपण या भटक्या ग्रहांना ‘स्वतंत्र’ म्हणू या.
अवकाशात स्वतंत्रपणे तरंगणारे असंख्य ग्रह कुठल्याच ताऱ्याला ‘बांधील’ किंवा त्याच्या ‘अंकित’ नसतात. आपली ग्रहमाला आपल्या सूर्यापासून निर्माण झाली. म्हणजे ग्रहांच्या जन्मासाठी एक ‘जनक’ तारा (पेरेन्ट स्टार) लागतो. त्यावरून हे ‘स्वतंत्र’ ग्रह आधी एखाद्या ताऱ्यापासून निर्माण होऊन त्याच्या बंधनातून सुटून दूर भिरकावले गेले असण्याचीही शक्यता आहे. दुसऱ्या सिद्धांतानुसार विश्वनिर्मितीच्या प्रक्रियेत असे ग्रह एकटेच जन्माला आले असण्याची शक्यता आहे. कारण विश्वात असे अनेक ‘ट्रिलियन’ (एकावर 12 शून गुणिले कितीही) स्वतंत्र ग्रह भिरभिरतायत.
मग त्यातला एखादा ‘चक्रम’ ग्रह भरकटत आपल्या पृथ्वीवर येऊन आदळेल का? ही धास्ती अशासाठी की, आपल्या ‘आकाशगंगा’ दीर्घिकेतच अब्जावधी ‘स्वतंत्र’ ग्रह फिरतायत. मात्र अभ्यासकांच्या मते असा कुठलाही ‘भटका’ ग्रह पृथ्वीपर्यंत पुढच्या हजार वर्षांत येण्याची शक्यता एक अब्जाशही नाही.
विश्वात काही ग्रह-वस्तुमान, ताऱ्यासदृश पद्धतीने निर्माण झाले असावेत. त्यामुळे आंतरराष्ट्रीय खगोल अभ्यास संस्थेने त्यांना उप-तपकिरी-खुजे समजावं (सब ब्राऊन ड्वार्फ) त्याचं एक संभाव्य उदाहरण सीएचए-110913-773444 या क्रमांकाच्या ‘रोग’ ग्रहाचं असू शकेल.
हे लोन्ली (एकटे) ग्रह सन 2000 मध्ये प्रथम नोंदले गेले. त्यानंतर स्पॅनिश आणि जपानी निरीक्षकांनाही ‘एकल-ग्रह’ दिसले. नंतर 2004 मध्ये अमेरिकन संशोधकांनीही त्यात भाग घेऊन वर्णपटाच्या आधारे त्याची निश्चिती केली. ताकाहिरो या जपानी खगोलभौतिकी संशोधकाने ओकासा विद्यापीठातील सहकाऱ्यांसह न्यूझीलँडच्या माऊंट जॉन वेधशाळेतून तसंच स्वतःच्या दुर्बिणीतून आकाशगंगेतील सुमारे 5 कोटी ताऱ्यांचं निरीक्षण केलंय. ते करताना त्यांना मायक्रोलेन्सिंग पद्धतीने सुमारे 474 एकल ग्रह सापडले. त्यातले 10 गुरूच्या आकाराचे प्रचंड होते, परंतु या ग्रहांच्या ‘जनक’ ताऱ्याचा सुगावा लागला नाही किंवा मागोवा घेता आला नाही.
अशा ग्रहांच्या शोधाची मायक्रोलेन्सिंग प्रक्रिया हा वेगळा विस्तृत विषय होईल. तज्ञांशी चर्चा करून त्यावर सोप्या शब्दांत लिहावे लागेल. आपण सध्या एवढेच लक्षात ठेवू या की, आपला ग्रह सौर-कुटुंबाचा ‘कुटुंबवत्सल’ सभासद आहे, पण त्याच वेळी अंतराळात असंख्य एकटे किंवा ‘स्वतंत्र’ ग्रह फिरतायत.
























































