रंगभूमीचा अमूल्य ठेवा डिजिटल स्वरूपात

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

महाराष्ट्राच्या समृद्ध नाटय़परंपरेचा ठेवा जपण्यासाठी शासनाने हाती घेतलेली ‘दुर्मिळ नाटक जतन व संवर्धन योजना’ ही अत्यंत स्तुत्य आणि दूरदृष्टी दाखवणारी आहे. 1960 पूर्वीची अनेक दर्जेदार आणि दुर्मिळ मराठी नाटके काळाच्या ओघात लुप्त होण्याच्या मार्गावर होती. त्या नाटकांना नवजीवन देण्याचे महत्त्वपूर्ण काम या योजनेतून केले जात आहे.

या उपक्रमांतर्गत निवडक नाटकांचे पुनरुज्जीवन करून त्यांचे अत्याधुनिक 4 के तंत्रज्ञानात ध्वनी-चित्रमुद्रण केले जाते. त्यामुळे केवळ नाटकांचे दस्तऐवजीकरण होत नाही, तर त्या काळातील अभिनयशैली, दिग्दर्शन आणि नाटय़भाषाही जतन होते. पुढील पिढय़ांना अभ्यासासाठी आणि रसास्वादासाठी ही नाटके उपलब्ध करून देण्याचा उद्देशही या योजनेतून साध्य होत आहे.

आजवर आचार्य अत्रे यांचे ‘मी उभा आहे’, पुलंची ‘भाग्यवान’ आणि ‘तुका म्हणे आता’, लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांचं ‘मुंबई कोणाची’ अशी अनेक नाटपं प्रेक्षकांसाठी उपलब्ध करून देण्यात आली आहेत. याच मालिकेत आता जयवंत दळवी लिखित आणि कुमार सोहोनी दिग्दर्शित ‘मुक्ता’ या नाटकाची भर पडते आहे. या नाटकाचा डिजिटल स्वरूपातील प्रयोग शुक्रवार 10 एप्रिल रोजी दुपारी 3 वाजता पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमीच्या चौथ्या मजल्यावरील नॅनो थिएटरमध्ये विनामूल्य आयोजित केला आहे. कला अकादमी आणि सांस्कृतिक कार्य विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने राबवली जाणारी ही योजना मराठी रंगभूमीच्या वारशाला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देत तो अधिक सक्षमपणे पुढे नेण्याचा प्रयत्न करत आहे.