नव्या मेट्रो मार्गिकांवर पहिला दिवस हौशी प्रवाशांचा! एमएमआरडीएच्या सेवेवर संमिश्र प्रतिक्रिया

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मेट्रो-9 (दहिसर पूर्व ते काशीगाव) आणि मेट्रो-2बी (मंडाळे-डायमंड गार्डन) या दोन नव्या मार्गिकांवर अखेर बुधवारपासून प्रवाशी सेवा सुरू झाली. सेवेच्या पहिल्या दिवशी अनेक हौशी प्रवाशांनी मेट्रो प्रवासाचा आनंद लुटला. मुंबई आणि ठाण्याची कनेक्टिव्हिटी वेगवान झाल्याने अनेक प्रवाशांनी समाधान व्यक्त केले, तर काही प्रवाशांनी मेट्रो स्थानके व सेवेतील अपुरेपणाकडे लक्ष वेधले. चार-पाच स्थानकांचा कमी पल्ल्याचा मेट्रो प्रवास केल्यानंतर प्रवाशांनी एमएमआरडीएच्या सेवेवर संमिश्र प्रतिक्रिया नोंदवल्या.

पश्चिम उपनगरातील मेट्रो-9 आणि पूर्व उपनगरातील मेट्रो-2बी या दोन्ही मार्गिकांचे मंगळवारी लोकार्पण करण्यात आले. त्यानंतर दुसऱ्या दिवशी म्हणजे बुधवारी सकाळी 6 वाजता दोन्ही मार्गिकांवर पहिली मेट्रो प्रवाशी सेवेत धावू लागली. पहिल्याच दिवशी कुतूहलापोटी अनेक प्रवाशांनी मेट्रो स्थानकात हजेरी लावली.