India’s Got Latent चा दुसरा सीझन येणार, कॉमेडियन समय रैनाकडून घोषणा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कॉमेडियन समय रैना याने आपल्या लोकप्रिय यूट्यूब शो India’s Got Latent च्या दुसऱ्या सिझनची अधिकृत घोषणा केली आहे. त्याच्या खास शैलीत—हास्य, मोकळेपणा आणि प्रामाणिकपणा यांचा मिलाफ करत—त्याने ही घोषणा आपल्या नवीन स्टँड-अप स्पेशलमधून केली.

मंगळवारी प्रदर्शित झालेल्या स्टँड-अपमध्ये समयने शोच्या पुनरागमनाबाबत वारंवार विचारल्या जाणाऱ्या प्रश्नाला उत्तर दिले. “India’s Got Latent परत येणार का, असा प्रश्न लोक मला सतत विचारतात,” असे तो म्हणाला. यावर पुढे बोलताना त्याने सांगितले की, “मी या गोष्टीवर खूप विचार केला आहे. मला वाटत नाही की यापेक्षा चांगल्या टप्प्यावर सिझन 1 संपुष्टात येऊ शकला असता,” असे म्हणत त्याने पहिल्या सिझनच्या यशाची कबुली दिली.

यानंतर त्याने स्पष्ट केले की शोचा दुसरा सिझन नक्कीच येणार आहे. “हा शो मी पुन्हा घेऊन येणारच, कारण तो करताना खूप मजा येत होती,” असे समयने सांगितले. तसेच नव्या सिझनबाबतची आपली कल्पना मांडताना तो म्हणाला की, यावेळी शो अधिक ‘वाइल्ड’ स्वरूपात सादर केला जाईल. “मी पूर्णपणे हटके आणि बिनधास्त असा शो करायचा विचार करतोय. इंटरनेटवर त्याचा थोडा सौम्य (soft) व्हर्जन टाकला जाईल,” असेही त्याने स्पष्ट केले.

India’s Got Latent हा यूट्यूबवरील रोस्ट-स्टाइल टॅलेंट शो असून, फेब्रुवारी २०२५ मध्ये वादामुळे तो बंद करण्यात आला होता. या वादात रणवीर अलाहबादिया याने शोदरम्यान विचारलेल्या एका प्रश्नावर मोठी टीका झाली होती. त्यानंतर शोचे सर्व भाग प्रायव्हेट करण्यात आले होते.

आता दुसऱ्या सिझनची घोषणा झाल्यानंतर प्रेक्षकांमध्ये उत्सुकता वाढली आहे. समय रैना यावेळी शो किती ‘बोल्ड’ आणि वेगळ्या पद्धतीने सादर करणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.