आफ्रिकन टोळीचा पर्दाफाश, देशभरातील १२ सायबर गुन्ह्यांशी संबंधित दोन जणांना दिल्लीत अटक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

देशभरातील विविध राज्यांमध्ये ५० लाख रुपयांहून अधिक रकमेची फसवणूक करणाऱ्या आंतरराष्ट्रीय सायबर गुन्हेगारी टोळीचा छडा लावत दिल्ली पोलिसांनी दोन आफ्रिकन नागरिकांना अटक केली आहे. ‘PTI’ ने यासंदर्भातील वृत्त दिले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हे आरोपी ऑनलाइन प्लॅटफॉर्मवर महिला असल्याचे भासवून हिंदुस्थानी नागरिकांशी मैत्री करत असत आणि भावनिक नाते निर्माण करत असत. त्यानंतर आपण हिंदुस्थानात येत आहोत, असे सांगून विमानतळावर अडकल्याच्या किंवा इमिग्रेशनशी संबंधित समस्यांच्या बनावट कथा रचून, क्लिअरन्स आणि इतर खर्चाच्या नावाखाली पीडितांकडून पैसे उकळत असत.

नॅशनल सायबर क्राईम रिपोर्टिंग पोर्टलवर (NCRP) नोंदवलेल्या तक्रारी, संशयास्पद बँक खात्यांचे तांत्रिक विश्लेषण आणि पाळत ठेवल्यानंतर या आरोपींना अटक करण्यात आली आहे. पोलिसांना विविध बँकांमध्ये वेगवेगळ्या नावांनी उघडलेली, अशी अनेक म्यूल बँक खाती सापडली आहेत, ज्यांचा वापर पीडितांकडून पैसे मिळवण्यासाठी केला जात होता. आतापर्यंत किमान १२ तक्रारींचा संबंध या आरोपींशी जोडला गेला असून एकूण ५० लाख रुपयांहून अधिक रकमेची फसवणूक उघड झाली आहे.

दरम्यान, या दोन्ही आरोपींचे दिल्ली-NCR परिसरात अंमली पदार्थांच्या तस्करीशी (Drug Trafficking) संबंध असल्याचा संशय देखील पोलिसांनी व्यक्त केला असून त्या दिशेने अधिक तपास सुरू आहे. या टोळीतील इतर सदस्यांचा शोध घेण्याचे काम पोलीस करत आहेत.