भरत परत येतोय! 3 वर्षांपूर्वी नाट्यप्रयोग थांबवून प्रशासनाला दिलेल्या दणक्यानं सुधारलं रत्नागिरीचं नाट्यगृह

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> दुर्गेश आखाडे

तीन वर्षापूर्वीची २० मे २०२३ ची गोष्ट आहे. मे महिन्यातील असह्य उकाडा सुरू होता.स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकर नाट्यगृहात “तू तू मी मी” चा प्रयोग सुरू होता.नाट्यगृहातील वातानुकूलित यंत्रणा बंद आणि ध्वनी यंत्रणेच्या समस्येमुळे अभिनेते भरत जाधव यांनी प्रयोग मध्येच थांबवत प्रचंड संताप व्यक्त केला होता. भरत जाधव यांच्या नपिचक्यामुळे प्रशासनाला जागा आली होती. आता त्याच सुसज्ज स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकर नाट्यगृहात अभिनेते भरत जाधव तीन वर्षांनंतर पुन्हा नाट्यप्रयोग करत आहेत. त्यामुळे रत्नागिरीच्या सुसज्ज अशा नाट्यगृहात भरत परत येतोय!

रत्नागिरी शहरातील स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकर नाट्यगृहात २० मे २०२३ रोजी “तू तू मी मी” चा प्रयोग सुरू होता. त्यावेळी नाट्यगृहांतून वातानुकूलित यंत्रणा ठप्प होती. ५०० रूपयांचे तिकीट काढून आलेले प्रेक्षक घामाघूम झाले होते. कुचकामी ध्वनीयंत्रणेमुळे संवादही प्रेक्षकांना ऐकू येत नव्हते. रंगमंचावर कलाकार घाम पुसत अभिनय करत होते. अखेर मुख्य अभिनेते भरत जाधव यांचा संयम सुटला आणि प्रयोग मध्येच थांबवत नाट्यगृहाच्या दयनीय अवस्थेबाबत प्रशासनाला सुनावले होते.

ही बातमी प्रचंड व्हायरल होऊन वातावरण तापले होते. त्यानंतर प्रशासन जागे झाले आणि स्वातंत्र्यवीर वि.दा. सावरकर नाट्यगृहाचे नूतनीकरण करण्यात आले. वातानुकूलित यंत्रणा आणि ध्वनी यंत्रणेमध्ये प्रचंड सुधारणा करण्यात आल्या आहेत. नाट्यगृहात सुधारणा झाल्यानंतर अभिनेते भरत जाधव तीन वर्षांनंतर पुन्हा स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकर नाट्यगृहात “शंकर जयकिशन “ नाटकाचा प्रयोग करायला १४ एप्रिल रोजी येत आहेत.

“प्रेक्षकांना एक चांगला नाट्यप्रयोग पहायला मिळायला हवा हीच माझी त्यावेळी अपेक्षा होती.आता नाट्यगृह चांगले झाले आहे त्यामुळे आता प्रेक्षक चांगला नाट्यप्रयोग पहायला मिळेल आणि त्यांना आनंद मिळेल“

भरत जाधव , अभिनेता