
पती-पत्नीच्या पवित्र नात्याला काळिमा फासणारी एक धक्कादायक घटना राजस्थानमधील अलवर येथे उघडकीस आली आहे. एका विवाहित महिलेने आपल्या प्रियकराच्या मदतीने स्वतःच्या पतीच्या हत्येचा कट रचल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे. या प्रकरणी एनईबी पोलिसांनी दोन्ही आरोपींना अटक करून न्यायालयात हजर केले असता, मुख्य आरोपी अर्चना हिला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे, तर तिचा प्रियकर ऋषभ याला एक दिवसाची पोलीस कोठडी देण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, आयसीआयसीआय बँकेत प्रादेशिक प्रमुख म्हणून कार्यरत असलेल्या 32 वर्षीय कर्णव खत्री यांनी 7 मार्च रोजी यासंदर्भात तक्रार दाखल केली होती. खत्री यांचा विवाह 2018 मध्ये गोविंदगड येथील अर्चना (30) हिच्याशी झाला होता आणि त्यांना दोन मुले आहेत. अर्चना कामानिमित्त बाहेर जाताना अनेकदा ऋषभ नावाच्या टॅक्सीचालकाच्या गाडीतून प्रवास करत असे. या प्रवासादरम्यान दोघांमध्ये सूत जमले आणि त्यांनी एकत्र राहण्याचा निर्णय घेतला. 7 सप्टेंबर 2025 रोजी अर्चना आपल्या धाकट्या मुलासह घरातील 5 लाख रुपयांचे दागिने आणि रोकड घेऊन ऋषभसोबत पळून गेली होती. त्यानंतर जानेवारी 2026 पासून ती पुन्हा ऋषभसोबत राहू लागली.
तक्रारीनुसार, 8 फेब्रुवारी 2026 रोजी ऋषभने खत्री यांना व्हॉट्सॲप कॉलवरून जीवे मारण्याची धमकी दिली होती. त्यानंतर मार्च 2026 मध्ये एका प्रवासादरम्यान ऋषभने खत्री यांना टॅक्सीने जयपूरला नेले आणि वाटेत त्यांच्या हत्येचा प्रयत्न केला. या हल्ल्यातून बचावल्यानंतर खत्री यांनी पोलिसात धाव घेत ऑडिओ रेकॉर्डिंगसह पुरावे सादर केले. विशेष म्हणजे, यापूर्वी अर्चनाने पती आणि माहेरच्या लोकांच्या दबावाखाली ऋषभवर बलात्काराचा गुन्हा दाखल केला होता, मात्र नंतर तिने आपला जबाब मागे घेतला होता.
ऋषभला पोलिसांनी अटक केल्यानंतर अर्चनाने पतीला एक धमकीचे पत्र पाठवून 50 लाख रुपयांची मागणी केली. “आधी मी वादावर पडदा टाकण्यासाठी 30 लाख मागितले होते, पण आता तुम्ही ऋषभला तुरुंगात पाठवल्यामुळे 50 लाख रुपये द्यावे लागतील. पैसे न दिल्यास तुम्हाला आणि तुमच्या आईला ठार मारून मुलांना अनाथाश्रमात सोडू,” अशी धमकी तिने पत्राद्वारे दिली. तसेच राजगडमध्ये तुमच्यावर गुन्हा दाखल असून न्यायालयात आल्यास तुमचे ‘काम तमाम’ करू, असा इशाराही तिने दिला होता. या सर्व गंभीर प्रकारानंतर पोलिसांनी तातडीने पावले उचलत दोघांनाही बेड्या ठोकल्या आहेत. शहर सीओ अंगद शर्मा या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

























































