
ट्रेकिंगदरम्यान कर्नाटकातील चिक्कमगलूरू जिल्ह्यातील चंद्रद्रोणा पर्वतरांगेतून बेपत्ता झालेल्या 14 वर्षीय श्रीनंदाचा माणिक्यधारा धबधब्याजवळ मृतदेह सापडला. श्रीनंदा गेल्या दिवसांपासून बेपत्ता होती. पोलीस आणि बचाव पथके तिचा शोध होते. शोध मोहिमेदरम्यान, दोन हजार फूट खोल दरीत धबधब्याजवळ तिचा मृतदेह सापडला.
टीव्ही 9 भारतवर्षने दिलेल्या वृत्तानुसार, श्रीनंदा केरळमधील 40 पर्यटकांच्या ग्रुपसोबत चंद्रद्रोणा पर्वतरांगेत चिक्कमगलूरू येथे ट्रेकिंगसाठी आली होती. तिचे कुटुंबीयही सोबत होते. याच दरम्यान 7 एप्रिल रोजी श्रीनंदा अचानक गायब झाली. बराच वेळ शोध घेऊनही ती न सापडल्याने तिच्या कुटुंबीयांनी स्थानिक पोलिसांना माहिती दिली. यानंतर एसडीआरएफ, अग्निशमन दल, स्थानिक पोलीस आणि एएनएफच्या पथकांनी संयुक्त शोधमोहीम राबवली.
चंद्रद्रोणा पर्वतातील घनदाट जंगल आणि दुर्गम डोंगराळ प्रदेश यामुळे मुलीचा शोध घेणे मोठे आव्हान होते. खोल दऱ्या आणि घनदाट जंगलांमध्ये शोध घेण्यासाठी पथकांनी ड्रोन आणि थर्मल कॅमेऱ्यांचाही वापर केला. अखेर तीन दिवसांच्या शोधमोहिमेनंतर शुक्रवारी श्रीनंदाचा मृतदेह माणिक्यधारा भागातील खोल दरीत सापडला. मृतदेह दोन हजार फूट खोल दरीत खडकांमध्ये अडकला होता. बचाव पथकांनी मोठ्या प्रयत्नांनंतर मृतदेह बाहेर काढला. हा अपघात आहे की घातपात याबाबत पोलीस तपास करत आहेत.


























































