
बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी राज्यसभेचे सदस्य म्हणून शपथ घेतल्यानंतर राज्याच्या राजकारणात मोठे बदल होण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. काँग्रेस खासदार राजीव शुक्ला यांनी यावर प्रतिक्रिया देताना “हा बिहारमधील ‘नितीश युगाचा’ अंत आहे,” अशी टीका केली आहे.
शुक्ला यांनी सांगितले की, नितीश कुमार यांची राज्यसभेत जाण्याची प्रक्रिया ही भाजपची पूर्वनियोजित रणनीती होती. “2025 च्या बिहार विधानसभा निवडणुकांपर्यंत नितीश कुमार यांना पुढे ठेवायचे आणि नंतर त्यांना बाजूला सारून स्वतःचा मुख्यमंत्री बनवायचा, हा भाजपचा जुना डाव होता,” असा आरोप त्यांनी केला. राष्ट्रीय राजकारणात नितीश कुमार यांना पुढे काय भूमिका दिली जाईल, हेही अनिश्चित असल्याचे त्यांनी नमूद केले.
नवीन मुख्यमंत्री भाजपकडूनच असेल का, या प्रश्नावर शुक्ला यांनी “होय, तसेच दिसते,” असे स्पष्ट उत्तर दिले.
दरम्यान, नितीश कुमार यांनी राज्यसभेचे सदस्य म्हणून शपथ घेतली असून त्यांनी यापूर्वी बिहार विधान परिषद सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. जनता दल (युनायटेड) चे एमएलसी संजय गांधी यांनी त्यांचा राजीनामा परिषद अध्यक्ष अवधेश नारायण सिंह यांच्याकडे सादर केला.

























































