
सोन्या-चांदीच्या भावात सध्या मोठी घसरण सुरू असून आज कमोडिटी मार्केटमध्ये दर चांगलेच कोसळलेले पाहायला मिळाले. अमेरिका आणि इराणमध्ये सुरू होणाऱ्या शांतता चर्चेमुळे सोन्या-चांदीच्या किमतीत ही घट झाली आहे. एमसीएक्स (MCX) मार्केटमध्ये १० ग्रॅम सोन्याचा भाव १,७०० रुपयांनी कमी होऊन तो १,५१,७०० रुपयांवर आला आहे. चांदीच्या दरातही मोठी घट झाली असून, चांदी ४,००० रुपयांनी स्वस्त होऊन २,३९,६८५ रुपये प्रति किलोवर पोहोचली आहे.
जागतिक बाजारपेठेत सोन्या-चांदीचे भाव दबावाखाली असल्याने त्याचा परिणाम हिंदुस्थानच्या बाजारावर दिसत आहे. सध्या अमेरिका आणि इराणमधील तणाव कमी करण्यासाठी मध्यस्थी सुरू असून त्याबाबत जोपर्यंत चित्र स्पष्ट होत नाही, तोपर्यंत गुंतवणूकदार आपले पैसे काढून नफा कमावण्यावर भर देत आहेत. यामुळेच सोन्या-चांदीच्या भावात सातत्याने चढ-उतार पाहायला मिळत आहेत.
विशेष म्हणजे, सोन्या-चांदीने गाठलेल्या आतापर्यंतच्या सर्वोच्च दराच्या तुलनेत आताचे दर बरेच कमी झाले आहेत. चांदीचा उच्चांकी दर ४.३९ लाख रुपये होता, जो आता २.३९ लाखांपर्यंत खाली आला आहे, म्हणजेच चांदी २ लाखांनी स्वस्त झाली आहे. सोन्याचा उच्चांकी दर २.०२ लाख रुपये होता, तो आता १.५१ लाखांवर आला असून सोन्यात साधारण ४९,००० रुपयांची घसरण झाली आहे.



























































