
महिलांची अब्रू व सुरक्षा ही कोणत्याही धर्माच्या बाबतीत सारखीच असायला हवी, पण पाखंडी हिंदुत्ववाद्यांकडून महिलांवर अत्याचार करण्याची सूट हिंदू बाबांना दिली जाते व मुसलमानांच्या बाबतीत वेगळी भूमिका घेतली जाते. ढोंगी बाबांनी हिंदू धर्म आणि संस्कृतीची प्रतिमाच मलिन केली. स्त्रीशक्तीचे रक्षण व अंधश्रद्धा, ढोंगाला विरोध हे खरे हिंदुत्व आहे. नाशिकमध्ये हिंदुत्वाच्या दोन स्वतंत्र व्याख्या निर्माण झाल्या. नाशिकच्या पीडित महिलांना न्याय द्यायची इच्छा असेल तर ढोंगी हिंदुत्ववाद्यांनी स्वतःच्या दारातील घाण साफ करावी. ‘कॉर्पोरेट जिहाद’चा निषेध करताना खरात-एरंडे बाबांनी केलेल्या हिंदू नारी शोषणाचाही धिक्कार करावा. नाशिकच्या गोदावरीत आज तरी ढोंगी हिंदुत्ववाद्यांचीच पापकर्मे जास्त तरंगताना दिसत आहेत. महिलांवरील अत्याचार हे तरी धर्मनिरपेक्ष असावेत!
महाराष्ट्रात हिंदुत्ववादी म्हणवून घेणाऱ्यांची नवी पैदाईश जन्माला आली आहे. सोयीनुसार ते हिंदुत्ववादी होतात. निवडणुकांच्या हंगामात त्यांचे हिंदुत्व भलतेच जहाल होते. एखाद्या मुसलमानी मुल्ला-मौलवीचे प्रेम प्रकरण हाती लागले की, त्या विषयाचा शिरकूर्मा हे लोक ओरपून भुरकतात, पण तीच अधम कृत्ये एखाद्या हिंदू ढोंगी बाबाने केल्याचे समोर आल्यावर मात्र हे हिंदुत्ववादी तोंड शिवून गप्प बसतात. नाशिक जिल्ह्यात सध्या अशा ढोंगबाजीने कहर केला आहे. नाशकात ‘कॉर्पोरेट जिहाद’ नावाचा नवा उपद्व्याप उघड झाला आहे. एका नामांकित ‘मल्टिनॅशनल’ आयटी कंपनीत मुस्लिम कर्मचाऱ्यांनी हिंदू तरुणींना नोकरीचे आमिष दाखवून लैंगिक शोषण केले. त्यांना जबरदस्तीने मांसाहार करण्यास भाग पाडले. त्यांच्या धर्मांतराचाही प्रयत्न झाला. या प्रकरणाचा स्फोट होताच धक्का बसणे व त्यानंतर खळबळ उडणे साहजिकच आहे. या प्रकरणातील आरोपी हे मुसलमान आहेत. त्यामुळे भाजपने त्यांचे शंकराचार्य नितोबा महाराज, गोपीचंद महाराज वगैरेंना नाशिक प्रकरणात शंखनाद करायला लावला. एवढ्यावर न थांबता त्यांची नाशकात ‘लव्ह जिहाद’ कसा भयंकर, भयानक आहे यावर संतप्त भाषणे सुरू आहेत. अर्थात महिलांचा छळ, शोषण व धर्मांतराची जबरदस्ती अशा गुन्ह्यांना माफी असता कामा नयेच, पण आरोपीची जात व धर्म पाहून गुन्ह्याची तीव्रता ठरवण्याचा राजकीय प्रकार निर्लज्जपणाचा कळस आहे. महिलांचा छळ हा छळच आहे. तो कोणत्याही धर्माच्या नावाखाली असो. ‘कॉर्पोरेट जिहाद’ तसेच
हिंदुत्व खतऱ्यात
आल्याच्या गर्जना भाजपचे राजकीय भोंदूबाबा करीत आहेत व त्यानिमित्ताने हिंदू समाजाने एक होऊन मुकाबला करावा असे सांगितले जात आहे, पण त्याच नाशिकच्या भूमीवर खरात बाबा आणि एरंडे बाबांनी महिलांचे शोषण केले, अत्याचार केले. असंख्य महिलांचे संसार मोडले. त्यावर मात्र या गोपी महाराज, नितेश बाबा व त्यांच्या शंखनादी हिंदुत्ववादी संघटनांचा आवाज बंद आहे. खरात बाबाने तंत्र-मंत्र, योनीपूजा, शुद्धीकरण या नावाखाली शेकडो महिलांचे शोषण केले. त्या घृणास्पद कृत्याचे शंभरावर व्हिडीओ बाहेर आले. गर्भवती महिलांनाही या नव हिंदू बाबांनी सोडले नाही. ड्रग्ज देऊन गुंगीत आणणे, बेहोश करणे, ब्लॅकमेल, धमक्या हे सर्व दैवी शक्तीच्या नावाखाली झाले. अनेक बडे अधिकारी, त्यांच्या बायका बदल्या-बढत्यांच्या कामासाठी या नव हिंदू बाबांना समर्पित झाल्या. यास कोणत्या प्रकारचा जिहाद म्हणावा? हे सर्व घडत असताना व उघड झाल्यावरही हिंदुत्ववादी नेते गप्पच राहिले. किंबहुना, शिवसेनेने हिंदुत्व सोडले म्हणून शिवसेना सोडून भाजपशी ‘लव्ह जिहाद’ करणारे मंत्री-संत्री, त्यांची बाया-पोरे ‘‘आमचेही शोषण तीर्थप्रसाद म्हणून करा’’ अशी याचना करीत या बाबांच्या दरबारी सेवा करीत होतेच. याच असल्या किळसवाण्या हिंदुत्वाच्या समर्थनासाठी कोणी पवित्र, ढोंगविरहित हिंदुत्वाचा पुरस्कार करणाऱ्या शिवसेनेचा त्याग केला असेल तर त्यांनी शिवसेनेवर उपकारच केले म्हणायचे. हे असले हिंदुत्व व त्यातील
किळसवाणे प्रकार
हिंदुहृदयसम्राटांनी कधीच मान्य केले नसते. खरात बाबाचे शोषण प्रकरण हादरे देत असताना नाशकात आणखी एका एरंडे बाबाचे प्रताप उघड झाले. 121 अश्लील व्हिडीओंसह हा एरंडे बाबा पकडला गेला. सरकारी नोकरी, लघुउद्योगात मदत अशा आमिषाखाली महिलांना फसवणे, शोषण करणे, त्यांचे व्हिडीओ बनवून ब्लॅकमेल करण्याचा त्याचा धंदा जोरात सुरू होता, पण एकही सकल हिंदुत्ववादी व गोपी महाराज, नितेश बाबासारखे लोक हिंदू महिला सुरक्षेसाठी पुढे आले नाहीत. अशा प्रकरणातील आरोपी मुस्लिम असतो तेव्हा ‘जिहाद’च्या नावाखाली मोर्चे, आंदोलने, ‘हिंदू खतरे में’, एसआयटीची मागणी जोर धरते, पण महिला शोषणांत आरोपी हिंदू बाबा असतो तेव्हा ‘अंधश्रद्धा’ व्यक्तिगत प्रकरण, हिंदू समाजाला बदनाम करू नका असे गाणे वाजवले जाते. महिलांची अब्रू व सुरक्षा ही कोणत्याही धर्माच्या बाबतीत सारखीच असायला हवी, पण पाखंडी हिंदुत्ववाद्यांकडून महिलांवर अत्याचार करण्याची सूट हिंदू बाबांना दिली जाते व मुसलमानांच्या बाबतीत वेगळी भूमिका घेतली जाते. ढोंगी बाबांनी हिंदू धर्म आणि संस्कृतीची प्रतिमाच मलिन केली. स्त्रीशक्तीचे रक्षण व अंधश्रद्धा, ढोंगाला विरोध हे खरे हिंदुत्व आहे. नाशिकमध्ये हिंदुत्वाच्या दोन स्वतंत्र व्याख्या निर्माण झाल्या. नाशिकच्या पीडित महिलांना न्याय द्यायची इच्छा असेल तर ढोंगी हिंदुत्ववाद्यांनी स्वतःच्या दारातील घाण साफ करावी. ‘कॉर्पोरेट जिहाद’चा निषेध करताना खरात-एरंडे बाबांनी केलेल्या हिंदू नारी शोषणाचाही धिक्कार करावा. नाशिकच्या गोदावरीत आज तरी ढोंगी हिंदुत्ववाद्यांचीच पापकर्मे जास्त तरंगताना दिसत आहेत. महिलांवरील अत्याचार हे तरी धर्मनिरपेक्ष असावेत!
































































