कर्मचाऱ्यांना तीन महिन्यांपासून पगार नाही, पाच महिन्यांपासून जीएसटी भरला नाही; ‘स्पाइसजेट’मध्ये 20 टक्के कर्मचारी कपात

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

जगभरात टेक कंपन्या धडाधड कर्मचारी कपात करत असताना आता देशातील खासगी विमान कंपनी स्पाइसजेट 20 टक्के कर्मचाऱयांना कामावरून काढून टाकणार आहे. यामध्ये 500 हून अधिक कर्मचारी विनावेतन सुट्टीवर पाठवले जाणार आहेत. विमान कंपनी सध्या गंभीर संकटातून जात आहे. स्पाइसजेटमध्ये काम करणाऱया वरिष्ठ अधिकाऱयांना जानेवारीपासून पगार मिळालेला नाही, तर अन्य कर्मचाऱयांना दोन ते तीन महिने उशिराने पगार मिळत आहे. कंपनीकडे पैसे नसल्याने कंपनीने टीडीएस एप्रिल 2025 पासून तर जीएसटी 5 महिन्यांपासून भरलेला नाही.

स्पाइसजेट विमान कंपनीकडे सध्या 6 हजार 800 कर्मचारी आहेत. स्पाइसजेटकडे केवळ 13 विमाने शिल्लक आहेत. त्यात 10 बोइंग आणि 3 क्यू400 या विमानांचा समावेश आहे. तसेच 14 विमाने वेट-लीजवर कर्मचाऱयांसह कार्यरत आहे. एअरलाइनने राजीनामा दिलेल्या डझनभर अभियंत्यांचा तीन महिन्यांचा नोटीस कालावधी रद्द केला आहे. 31 मार्चच्या आदेशानंतर या कर्मचाऱयांना तत्काळ नोकरी सोडण्यास सांगण्यात आले आहे. देशांतर्गत बाजारात स्पाइसजेटचा वाटा घसरून केवळ 3.9 टक्के राहिला आहे. तुलनात्मकदृष्टय़ा नवीन एअरलाइन अकासाचा 37 विमाने आणि 5,000 कर्मचाऱयांसह वाटा 4.9 टक्के आहे. जुने कर्मचारीही त्यांचे पूर्ण आणि अंतिम देय न मिळाल्याने नाराजी व्यक्त करत आहेत. स्पाइसजेटचा तोटा वाढण्यामागे काही कारणे आहेत. त्यात इंजिन दुरुस्त करणे, सुटे भाग बदलणे. स्पाइसजेटने दुसऱया तिमाहीत अनेक विमाने ग्राऊंडेड (उड्डाण बंद) ठेवली, ज्याचा खर्च 297 कोटी रुपयांपर्यंत पोहोचला. विस्ताराचा खर्चही वाढला. कारण नवीन विमाने खरेदी करण्यासाठी किंवा भाडेतत्त्वावर घेण्यासाठी पैसे लागले. यामुळे एपूण ऑपरेटिंग खर्च वार्षिक आधारावर 13 टक्क्यांनी वाढला.

पायलटचा पगारही घटला
स्पाइसजेटमध्ये काम करणाऱया पायलटसाठी कंपनीने नवीन नियम आणले आहेत. या नियमानुसार, पायलट यांना एका महिन्यात केवळ 21 दिवस काम आणि 9 दिवस सुट्टी घ्यावी लागेल. यामुळे पायलटचा पगार 7.5 लाखांऐवजी 6 लाखांपर्यंत खाली आला.