
अमेरिका आणि इराणमध्ये दोन आठवडय़ांची युद्धबंदी जाहीर झाल्यानंतर दोन्ही देशांमधील चर्चा इस्रायलमुळे अधांतरी आहे. एकीकडे अमेरिकेचे उपराष्ट्राध्यक्ष जे. डी. व्हेन्स यांच्या नेतृत्वातील शिष्टमंडळ पाकिस्तानला रवाना झाले आहे, तर दुसरीकडे इराणचे शिष्टमंडळ अद्याप रवाना झालेले नाही. लेबनॉनसाठी इराण ठाम आहे. चर्चा सुरू होण्यापूर्वी लेबनॉनमध्ये युद्धविराम आणि इराणच्या जप्त केलेल्या मालमत्ता मुक्त करणे या दोन अटी पूर्ण झाल्या पाहिजेत, असे इराणने स्पष्ट केले आहे. त्यामुळे इस्लामाबादमध्ये शनिवारी नियोजित असलेल्या शांतता चर्चेचे भविष्य टांगणीला लागलेले आहे.
अमेरिका आणि इराणने 8 एप्रिल रोजी दोन आठवडय़ांसाठी युद्धबंदीची घोषणा केली होती. पाकिस्तानात पुढील चर्चेसाठी दोन्ही देशांनी सहमती दर्शविली होती. मात्र, युद्धविरामाच्या चर्चेपूर्वीच इस्रायलने लेबनॉनवर गुरुवारी केलेल्या बेफाम हल्ल्यांमध्ये 200 पेक्षा जास्त नागरिकांचा मृत्यू झाला, तर आजदेखील इस्रायलने दक्षिण लेबनॉनमध्ये हल्ले केले. त्यात 12 जणांचा मृत्यू झाला.
खेळ खेळाल तर याद राखा!
जे. डी. व्हेन्स यांनी पाकिस्तानला रवाना होण्यापूर्वी इराणला इशारा दिला. इराणने कोणताही ‘खेळ’ खेळू नये. इराणने कोणतीही चलाखी केल्यास अमेरिका कठोर भूमिका घेईल, असे व्हेन्स यांनी सांगितले.
इराणच्या शिष्टमंडळाला पाकिस्तान हवाई दलाचे संरक्षण
इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानमध्ये रवाना झाल्यास पाकिस्तानचे हवाई दल त्यास संरक्षण देणार आहे. पाकिस्तानची लढाऊ विमाने इराणच्या बंदर अब्बास शहराजवळ तैनात करण्यात आली आहेत. ही विमाने इराणच्या शिष्टमंडळाला एस्कॉर्ट करतील. या ताफ्यात हवेत इंधन भरणारे आयएल-78 रिफ्युएलिंग टँकर विमान तसेच हवाई रडार यंत्रणादेखील तैनात करण्यात आली आहे. शांतता चर्चेत अडथळा आणणे किंवा इराणचे नेते तसेच अधिकाऱयांना लक्ष्य करण्यासाठी इस्रायल कोणतेही धाडस करू शकतो, अशी भीती पाकिस्तानला आहे.
ट्रम्प आणि पुतीन यांचा कंटाळा आला; स्टार्मर यांचा संताप
अमेरिका आणि इस्रायलने इराणविरोधात पुकारलेले युद्ध आणि रशियाने युव्रेनवर केलेल्या आक्रमणामुळे जगभराच्या पुरवठा साखळीवर मोठा परिणाम झाला आहे. ट्रम्प आणि पुतिन यांच्या कृतीमुळे अनेक उद्योग आणि व्यवसाय तोटय़ात आहेत. इंधानचे दर प्रचंड अस्थिर झाले आहेत. त्यामुळे या दोघांचा कंटाळा आला आहे, असे म्हणत ब्रिटनचे पंतप्रधान कीर स्टार्मर यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. इस्रायलने लेबनॉनवर हल्ले केले. यावरून स्टार्मर यांनी इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांच्यावर तीव्र टीका केली.
चर्चेआधी इराणच्या दोन अटी
जोपर्यंत लेबनॉनमध्ये युद्धविराम लागू होणार नाही, तोपर्यंत चर्चेत सहभागी होणार नाही, असे इराणने स्पष्टपणे म्हटले आहे. इराणच्या संसदेचे अध्यक्ष मोहम्मद बाघेर गलिबाफ यांनी ‘एक्स’वर पोस्ट टाकून इराणची भूमिका स्पष्ट केली. लेबनॉनमध्ये युद्धविराम आणि इराणची गोठवलेली संपत्ती मुक्त करणे या दोन बाबींची पूर्तता वाटाघाटींपूर्वी होणे अतिशय आवश्यक आहे, असे गलिबाफ यांनी स्पष्ट केले आहे.
इस्रायल ठरतोय खलनायक, वाटाघाटीच्या चर्चेत अनुपस्थित
पाकिस्तानमध्ये प्रस्तावित चर्चेला इस्रायलची अनुपस्थिती आहे. केवळ अमेरिका आणि इराणच्या शिष्टमंडळांमध्ये चर्चा होईल. मध्यस्थ म्हणून पाकिस्तानचे शिष्टमंडळ असेल. मात्र, इस्रायलचा कोणताही प्रतिनिधी त्यात सहभागी होणार नाही. आता इराणने युद्धबंदीमध्ये लेबनॉनची अट टाकूनदेखील इस्रायलने हल्ले केले. त्यामुळे इस्रायल या संपूर्ण घडामोडींमध्ये खलनायक ठरतोय.
करार न झाल्यास पुन्हा हल्ले – ट्रम्प
वाटाघाटींबाबत संभ्रम असताना डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा इराणला धमकावले. युद्धबंदीचा करार न झाल्यास अमेरिका पुन्हा हल्ला करेल, असा इशारा त्यांनी दिला. अमेरिकेच्या युद्धनौकांना सर्वोत्तम शस्त्रांनी सज्ज करण्यात येत आहे. गरज भासल्यास त्यांचा वापर केला जाईल, असे ट्रम्प म्हणाले.
इस्रायलचा 70 देशांकडून निषेध
इस्रायलने लेबनॉनमध्ये हल्ले सुरूच ठेवले आहेत. त्यात संयुक्त राष्ट्राच्या शांतीसेनेचे सैनिक मृत्युमुखी पडले आहेत. नुकत्याच झालेल्या हल्ल्यांत इंडोनेशियाचे तीन सैनिक ठार झाले. याविरोधात संयुक्त राष्ट्रांमध्ये इस्रायलचा निषेध करण्यात आला. हा प्रस्ताव इंडोनेशियाचे संयुक्त राष्ट्रांमधील राजदूतांनी वाचला. त्यास युरोपियन महासंघासह 63 देशांनी पाठिंबा दिला. शांतीसैनिकांवरील हल्ले हे युद्धगुन्हे ठरविले पाहिजेत, असे या प्रस्तावात म्हटले आहे.




























































