
पालघर शहरात आज आणखी एका निष्पाप नागरिकाचा हिट अॅण्ड रनने बळी घेतला. रस्त्याच्या कडेने चालणारे छायाचित्रकार राहुल दवे (52) यांना मागून आलेल्या भरधाव मोटारसायकलस्वाराने जोरदार धडक दिली. या अपघातात दवे यांचा मृत्यू झाला. या अपघातानंतर मोटारसायकल तशीच टाकून चालक फरार झाला. या अज्ञात मोटारसायकलस्वारावर पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून त्याचा कसून शोध सुरू आहे.
राहुल दवे हे पालघर शहरातील प्रसिद्ध छायाचित्रकार होते. ते पालघर-बोईसर रस्त्यावरील स्नेहांजली शोरूमजवळ फुटपाथच्या कडेने चालले असताना मागून भरधाव आलेल्या मोटारसायकल स्वाराने त्यांना जोरदार धडक दिली. या अपघातात दवे गंभीर जखमी झाले. त्यांच्या डोक्याला जबर मार लागला. त्यांना तातडीने पालघरमधील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांच्यावर गंभीर शस्त्रक्रियाही करण्यात आली. मात्र गेल्या तीन दिवसांपासून त्यांची सुरू असलेली मृत्यूशी झुंज अखेर आज संपली. दवे यांच्या पश्चात वडील, पत्नी आणि दोन मुले असा परिवार आहे.
मोटारसायकलस्वार पोलिसांना सापडेना
तीन दिवसांनंतरही दोन मोटारसायकलस्वार मित्रांची एकमेकांशी स्पर्धा सुरू होती. ते प्रचंड वेगात गाडी चालवत होते. त्यातच एका मोटारसायकलस्वाराचे नियंत्रण सुटले आणि त्याने थेट दवे यांना धडक दिली. या अपघातानंतर मोटारसायकलस्वार तरुण फरार झाला असून त्याच्या शोधासाठी पोलि सांनी पथक तयार केले आहे.



























































