
आखाती देशातील तणावादरम्यान अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी होर्मुझची सामुद्रधुनी लवकरच खुली केली जाईल, असा विश्वास व्यक्त केला आहे. इराणची मान्यता असो वा नसो, अमेरिका ही सामुद्रधुनी खुली करणारच, असे त्यांनी स्पष्ट केले. जॉइंट बेस अँड्र्यूज येथे पत्रकारांशी बोलताना त्यांनी याबाबत प्रतिक्रिया दिली. हे काम सोपे नाही, परंतु अमेरिका आणि इतर मित्र राष्ट्रे यासाठी एकत्र येऊन प्रयत्न करत आहेत. इतर अनेक देशही या मार्गाचा वापर करत असल्याने ते मदतीसाठी पुढे येत असल्याचे ट्रम्प यांनी सांगितले.
इंडिया टुडेने दिलेल्या वृत्तानुसार, इराणने होर्मुझच्या सामुद्रधुनीतून जाणाऱ्या तेलवाहू जहाजांवर प्रति बॅरल 1 डॉलर टोल आकारण्याची योजना असल्याने वृत्त आले होते. मात्र, ट्रम्प यांनी याला कडाडून विरोध केला असून ही आंतरराष्ट्रीय जलसीमा असल्याचे सांगत इराणला असा कोणताही कर वसूल करू दिला जाणार नाही, असे स्पष्ट केले. दुसरीकडे, या सामुद्रधुनीवर नियंत्रण असलेल्या ओमान देशाने अशा प्रकारची कोणतीही कर आकारणी करण्याची योजना नसल्याचे स्पष्ट करत इराणच्या दाव्यांना फेटाळून लावले आहे.
इराण आणि अमेरिका-इस्रायल यांच्यातील युद्धामुळे जागतिक ऊर्जा पुरवठ्यावर मोठा परिणाम झाला आहे. जगातील सुमारे 20 टक्के तेल आणि नैसर्गिक वायूचा पुरवठा याच सामुद्रधुनीतून होतो, जो सध्या ठप्प आहे. ट्रम्प यांनी नाटो (NATO) मित्रदेशांकडून या संकटात अपेक्षित मदत न मिळाल्याबद्दल नाराजी व्यक्त केली आहे. नाटोचे सरचिटणीस मार्क रुटे यांनीही युरोपीय देशांना या सागरी मार्गाच्या सुरक्षेसाठी तातडीने ठोस पावले उचलण्याचे आवाहन केले आहे.
दरम्यान दोन महिन्यांपूर्वी 28 फेब्रुवारी रोजी अमेरिका आणि इस्रायलने इराणवर केलेल्या हल्ल्यानंतर या युद्धाला सुरुवात झाली, ज्याला इराणनेही चोख प्रत्युत्तर दिले. या संघर्षामुळे हजारो निष्पाप लोकांचा बळी गेला असून लाखो लोकांचे नुकसान झाले आहे. सध्या दोन आठवड्यांचा युद्धविराम जाहीर झाला असला तरी, इस्रायलकडून लेबनॉनवर सुरू असलेल्या हल्ल्यांमुळे परिस्थिती अजूनही तणावपूर्ण आहे. जोपर्यंत हा महत्त्वाचा सागरी मार्ग पूर्णपणे खुला होत नाही, तोपर्यंत जागतिक बाजारपेठेतील कच्च्या तेलाच्या किमती आणि अनिश्चितता कायम राहण्याची शक्यता आहे.



























































