
>> संध्या शहापुरे
मराठी भाषकांच्या ध्यानीमनी असलेला हा लोकप्रिय श्लोक महत्त्वाचा आहे. श्रीराम हा महाप्रतापी असल्याने तुमच्याकडे कोणी वाकडय़ा नजरेने पाहणार नाही, असे आश्वासन या श्लोकात दिले आहे. लोकांच्या धैर्याला आत्मविश्वासाला बळकट केले आहे. रामाच्या भक्ताकडे कोणीही कपटी नजरेने पाहू शकणार नाही, असा धीर आत्मबल वाढवणारा आहे. शिवरायांच्या हिंदवी स्वराज्यात लोकांना धैर्य निर्माण करण्याची ताकद या शब्दात होती. वाल्मिकी रामायणातील ‘श्रीराम हा क्षात्रधर्माचा अवतार आहे’ हे रामाचे रुप रामदासांना लोकांच्या प्रत्ययास आणून द्यायचे होते. कारण सभोवताली चाललेली स्त्रियांची विटंबना ते पाहत होते. अत्याचार अपमानाचा व अन्यायाने कळस गाठला होता. रामदासांसारख्या विरक्त साधूंची मनेही दुखावल्याने संतप्त झाली होती. ‘दया क्षमा शांती, तेथे देवाची वसती’- असे म्हणणारे समकाळातले ‘संत तुकाराम’ हे नाठाळांना सजा देण्याचे आवाहन कसे करतात ते पाहू. ते म्हणतात- ‘भले तरी देऊ कासेची लंगोटी। नाठाळाचे माथा हाणु काठी। मायबापांहूनी आम्ही मायवंत। करू घात पाते शत्रू हूनी। अमृत ते काय गोड आम्हा पुढे। विष ते बापुडे कडू किती।’ धर्मरक्षणासाठी एक होण्याचा, लढण्याचे ध्येय बाळगण्याचा आत्मविश्वास आणि मनोबळ वाढवणारा श्लोक म्हणूनच महत्त्वपूर्ण आहे.






























































