
बेसुमार भाडे आकारून पालकांना हैराण करणाऱ्या स्कूल बसचालकांच्या मनमानीला आता चाप लागणार आहे. कारण स्कूल बसचे भाडे आता परिवहन विभाग ठरवणार आहे. शिवाय वर्षभराचे भाडे सरसकट एकरकमी भरण्याची गरज नसून आता पालक प्रत्येक महिन्याला भाडे देऊ शकणार असल्याने त्यांना दिलासा मिळणार आहे.
शालेय विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी सरकारने शालेय बस व वाहतूक व्यवस्थेबाबत कडक आणि सर्वसमावेशक नियमावली जाहीर करण्याची तयारी सुरू केली आहे. गृह विभागाने प्रसिद्ध केलेल्या मसुदा अधिसूचनेनुसार, महाराष्ट्र मोटार वाहन (शालेय बस नियमन-प्रथम सुधारणा) नियम, 2026 लागू करण्याचा प्रस्ताव असून, यात सुरक्षितता, पारदर्शकता आणि जबाबदारी यावर विशेष भर देण्यात आला आहे. शालेय वाहतुकीची नियमित तपासणी शिक्षण व परिवहन विभाग संयुक्तपणे करणार असून, त्याचे अहवाल जिल्हा पातळीवरील समितीकडे सादर केले जातील. या नव्या नियमांबाबत अधिसूचना जाहीर झालेल्या दिनांकापासून पंधरा दिवस या विहित वेळेत संबंधित संकेतस्थळावर सर्व सामान्य जनतेकडून हरकती व सूचना मागविण्यात आल्या असून त्याला सकारात्मक प्रतिसाद द्यावा, असे आवाहन परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी केले आहे.
विद्यार्थ्यांची सुरक्षा
प्रत्येक विद्यार्थ्याची चढ-उतार वेळेसह दैनिक उपस्थिती नोंदवणे बंधनकारक असेल. विशेषतः पूर्व-प्राथमिक आणि प्राथमिक (इयत्ता ५ वीपर्यंत) विद्यार्थ्यांसाठी प्रत्येक प्रवासात महिला परिचारिका किंवा नियुक्त कर्मचारी असणे आवश्यक राहील. विशेष गरजा असलेल्या विद्यार्थ्यांसाठी प्रशिक्षित कर्मचारी, सुलभ प्रवेश व्यवस्था आणि आवश्यक तेव्हा पालक/शिक्षक उपस्थितीची तरतूद करण्यात आली आहे. बस चालक, वाहक व इतर कर्मचाऱ्यांची पार्श्वभूमी तपासणी, वैद्यकीय फिटनेस प्रमाणपत्र आणि अधिकृत नियुक्तीपत्र अनिवार्य करण्यात आले आहे. सर्व नोंदी तपासणीसाठी उपलब्ध ठेवणे बंधनकारक असेल.
तर स्कूल बसचा परवाना रद्द
नवीन नियम लागू झाल्यानंतर तीन महिन्यांत सर्व शालेय वाहने नियमांनुसार सुसज्ज करणे आवश्यक राहील. अन्यथा संबंधित वाहनांचे परवाने निलंबित किंवा रद्द करण्याची तरतूद करण्यात आली आहे.
प्रत्येक शाळेत स्कूल ट्रान्सपोर्ट कमिटी
प्रत्येक शाळेत स्कूल ट्रान्सपोर्ट कमिटी कार्यरत राहणार आहे. ही कमिटी भाडे, सुरक्षितता आणि सेवा यासंबंधी पालकांच्या तक्रारींचे निवारण करेल. तसेच तिमाही अहवाल सादर करणे बंधनकारक करण्यात आले आहे.
बसमध्ये पॅनिक बटण
सर्व शालेय बस व व्हॅनमध्ये जीपीएस-आधारित व्हेइकल लोकेशन ट्रकिंग डिवाइस आणि पॅनिक बटण बंधनकारक करण्यात आले आहे. तसेच विद्यार्थ्यांसाठी प्रत्येक सीटला सीट बेल्ट लावणे सक्तीचे राहील.
डिजिटल मॉनिटरिंग
विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी प्रत्येक वाहनात डिजिटल सेफ्टी मॉनिटरिंग सिस्टम बसवणे आवश्यक असेल. याद्वारे वाहनाचे लाईव्ह ट्रकिंग, स्वयंचलित अलर्ट आणि पालकांना थेट माहिती मिळणार आहे.
























































