
सीम कार्ड हॅक करून लूट झालेल्या खातेदाराला उच्च न्यायालयाने दिलासा दिला आहे. या खातेदाराला तब्बल 38 लाख रुपये परत करण्याचे आदेश न्यायालयाने एचडीएफसी बँकेला दिले.
पुणे येथील सुबोध कोरडे यांची 2021मध्ये ही लूट झाली होती. सायबर गुन्हेगारांनी त्यांचे सीम कार्ड हॅक केले. त्यानंतर त्यांच्या ऑनलाईन बँकिंग व्यवहारात लाभार्थी जोडले. पैसे वितरित करण्याची मर्यादा 4 लाखांवरून 40 लाख केली. ही प्रक्रिया केल्यावर त्यांच्या खात्यातून 38.04 लाख वळते केले. याची माहिती मिळताच कोरडे यांनी बँकेत व पोलिसांत याची तक्रार केली. तसेच न्यायालयाचे दार ठोठावले व बँकेकडून परताव्याची मागणी केली.
न्या. भारती डांगरे व न्या. मंजुषा देशपांडे यांच्या खंडपीठासमोर या याचिकेवर सुनावणी झाली. बँक खात्यात होत असलेल्या प्रत्येक अपडेटची माहिती आम्ही कोरडे यांना एसएमएसद्वारे देत होतो. या लुटीसाठी बॅंकेला दोषी धरता येणार नाही, असा दावा बँकेने केला. तो न्यायालयाने अमान्य केला. कोरडे यांचे सीम कार्ड हॅक करण्यात आले होते. त्यामुळे त्यांना बँकेचा कोणताच मेसेज मिळाला नाही. उलट फसवणूक झाल्याचे कळताच त्यांनी तक्रार केली. या फसवणुकीसाठी त्यांना दोषी धरता येणार नाही, असे न्यायालयाने नमूद केले.
खातेदार बेजबाबदार नव्हता
कोरडे यांनी त्यांचा पासवर्ड कोणाला दिला नव्हता. ते बेजबाबदारपणे व्यवहार करत होते, असा कोणताही पुरावा बँकेने सादर केलेला नाही. बॅंकेने पाठवलेले मेसेज कोरडे यांना मिळाले नाहीत. यात बॅंकेचाही दोष नाही. पण नियमानुसार अशा खातेदाराची फसवणूक झाल्यास परतावा मिळायलाच हवा, असे न्यायालयाने नमूद केले.



























































