इराणने अमेरिकेच्या अटी शर्ती नाकारल्या, २१ तासांची चर्चा निष्फळ; अमेरिकेचे उपराष्ट्रपती जेडी व्हान्स यांची पत्रकार परिषदेत माहिती

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

अमेरिकेचे उपराष्ट्रपती जेडी व्हान्स यांनी रविवारी सांगितले की, पाकिस्तानात इराणसोबत झालेल्या २१ तासांच्या वाटाघाटींमधून कोणताही तोडगा निघाला नाही. विशेषतः शस्त्रसंधी सारखी अत्यंत नाजूक परिस्थिती सध्या असताना इराणने अमेरिकेच्या अटीशर्तींना नकार दिला आहे. पत्रकार परिषदेत व्हान्स यांनी दिलेल्या माहितीनुसार, “इराणने आमच्या अटी स्वीकारल्या नाहीत. राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सांगितले होते की, आपण सद्भावनेने वाटाघाटींमध्ये सहभागी होऊन एखादा करार करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. दुर्दैवाने, यात कोणतीही प्रगती झाली नाही.”

हिंदुस्थान टाइम्सने दिलेल्या माहितीनुसार, अमेरिकेच्या उपराष्ट्रपती व्हान्स यांनी स्पष्ट केले की, इराणने अणुशस्त्रे बाळगण्याचा किंवा येत्या काही वर्षांत ती विकसित करण्याचा प्रयत्न करणार नाही, अशी ठोस हमी अमेरिकेने मागितली होती. “त्यांचा अणुकार्यक्रम आणि त्यांच्याकडे पूर्वी असलेल्या अणु-समृद्धीकरण सुविधा नष्ट करण्यात आल्या आहेत. परंतु आणखी अणुशस्त्रे विकसित न करण्याबाबतची कोणतीही हमी त्यांच्याकडून देण्यात आली नाही,” असेही त्यांनी पुढे नमूद केले.

व्हान्स यांचे हे विधान ट्रम्प यांच्या विधानानंतर काही तासांतच आले. ट्रम्प यांनी म्हटले होते की, या वाटाघाटींचा निकाल काहीही लागला तरीही, अमेरिकेचाच विजय झाला आहे. “आम्ही त्या देशाला पूर्णपणे पराभूत केले आहे. कदाचित ते करार करतील, किंवा कदाचित करणार नाहीत. अमेरिकेच्या दृष्टिकोनातून सांगायचे तर, मला त्याची काहीही पर्वा नाही,” असे ते म्हणाले. पुढे बोलताना त्यांनी असेही म्हटले की, अमेरिकेने तेहरानचा लष्करीदृष्ट्या पराभव केला आहे.