
देशात चौथ्या क्रमांकाची सहकारी बँक म्हणून ओळख असलेल्या टीजेएसबीने (ठाणे जनता सहकारी बँक) २५ हजार कोटींचे उद्दिष्ट पार केले आहे. २०२५-२६ या आर्थिक वर्षात बँकेचा एकूण व्यवसाय २५ हजार ३६० कोटी रुपये इतका नोंदवण्यात आला आहे. त्यामध्ये १६ हजार २४४ कोटींच्या ठेवींचा आणि ९ हजार ११६ कोटी रुपयांच्या कर्जवाटपाचा समावेश आहे.
टीजेएसबी बँकेची स्थापना ५४ वर्षांपूर्वी झाली असून बँकेचा विस्तार आतापर्यंत १६५ शाखांपर्यंत पोहोचला आहे. महाराष्ट्रासह बँकेने राजस्थान आणि छत्तीसगड या राज्यांमध्येही आपल्या शाखा सुरू केल्या आहेत. त्यामुळे बँकेला बहुराज्यीय सहकारी
बँकेचा दर्जा प्राप्त झाला आहे. बँकेने २५ हजार कोटी रुपयांच्या व्यवसायाचा टप्पा पार केला असला तरी एकूण अनुत्पादिक कर्जाचे प्रमाण हे फक्त ३.११ टक्के तर निव्वळ अनुत्पादित कर्जाचे प्रमाण हे शून्य टक्के आहे. कर्जवाटपामध्ये योग्य नियोजन आणि व्यवस्थापनाने केल्यामुळे हे यश संपादित करता आले आहे, असे बँकेचे अध्यक्ष शरद गांगल यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. याप्रसंगी बँकेचे उपाध्यक्ष वैभव सिंगवी, व्यवस्थापकीस संचालक मुख्य कार्यकारी अधिकारी निखिल आरेकर आदी उपस्थित होते. २५ हजार कोटींचे उद्दिष्ट साध्य करताना बँकेने एकूण २८७ कोटी रुपयांचा नफा कमवला आहे. त्यामध्ये १५५ कोटी हा निव्वळ नफा आहे.
टीजेएसबीने गोवा येथील सिटिझन को-ऑपरेटिव्ह बँक आणि सावंतवाडी अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक यांचे विलिनीकरण केले आहे. त्यामुळे बँकेचा विस्तार मोठ्या प्रमाणात वाढला आहे. बँकेची प्रगती ही ग्राहकांच्या विश्वासामुळे झाली आहे. योजनाबद्ध विस्तार, पारदर्शी कारभार, कार्यक्षम प्रशासकीय कामकाज यापुढे अशाच पद्धतीने सुरू राहणार आहे, असेही शरद गांगल यांनी स्पष्ट केले आहे.




























































