वसई-नायगाव दरम्यान ओव्हरहेड वायर तुटली; पश्चिम रेल्वेची वाहतूक विस्कळीत, प्रवाशांचे हाल

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

पश्चिम रेल्वेच्या नायगाव आणि भाईंदर दरम्यान असणाऱ्या खाडी पुलावरील ओव्हरहेड वायर तुटल्यामुळे रविवारी सकाळी लोकल सेवा विस्कळीत झाली. ओव्हरहेड वायरच्या दुरुस्तीसाठी लांब पल्ल्याच्या गाड्या अडवण्यात आल्या होत्या. यामुळे विरार, नालासोपारा व वस‌ई स्थानकात प्रवाशांची मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती. विरारच्या जिवदानी मंदिरात भाविकांची व समुद्रकिनारी असलेल्या रिसाॕर्टवर पर्यटकांची गर्दी कमी झालेली दिसत होती.

रविवारी सकाळी ओव्हरहेडच्या तांत्रिक बिघाडामुळे विरार ते चर्चगेट मार्गावर लोकल सेवा विस्कळीत झाली होती. नायगाव आणि भाईंदर दरम्यान असणाऱ्या खाडी पुलावर ओव्हरहेड वायरमध्ये बिघाड झाल्यामुळे सर्वच मार्गांवरील लोकल गाड्या काही काळ थांबवण्यात आल्या होत्या.

विरार, डहाणू तसेच बोरीवली आणि चर्चगेट या मार्गांवर धावणाऱ्या लोकल अर्धा ते पाऊण तास उशिराने चालवल्या जात होत्या. यामुळे सुट्टीनिमित्त तसेच कामानिमित्त बाहेर पडलेल्या प्रवाशांची मोठी तारांबळ उडाली. तर ओव्हरहेड वायर दुरुस्त होईपर्यंत लोकलमधील प्रवासी रेल्वे रुळांवर फिरतानाचे, लोकलच्या दरवाज्यावर बसल्याचे व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल झाल्याचे दिसून येत आहे.

रविवारी सकाळी ओव्हरहेड वायर तुटल्याने रेल्वे सेवा विस्कळित झाल्याने त्याचा मोठा फटका रिसाॕर्ट उद्योगाला बसला आहे.अर्नाळा, नवापूर,कळंब या समुद्रकिनारी सुट्टीच्या दिवशी मोठ्या प्रमाणात पर्यटक पर्यटनासाठी येत असतात.या परीसरात तरण तलाव असलेले मोठे ४० तर छोटे जवळपास ८० रिसॉर्ट आहेत. रविवारच्या एका दिवसात जवळपास एक ते सव्वा लाख पर्यटक येत असतात.मात्र आज रेल्वे सेवा विस्कळित झाल्याने जवळपास २५ टक्के म्हणजे ३० ते ३५ हजार पर्यटक सकाळी रिसाॕर्टवर पोहचू शकले नसल्याने व्यवसायावर मोठा परीणाम झाला आहे.

रामदास मेहेर,अध्यक्ष -वस‌ई तालुका रिसाॕर्ट असोसिएशन

रेल्वे गाड्या रखडल्यामुळे स्थानकांवर प्रवाशांची प्रचंड गर्दी उसळली असून, सर्वच प्लॅटफॉर्मवर प्रवाशांचे हाल होताना दिसत आहेत. अचानक उद्भवलेल्या या परिस्थितीमुळे विरार ते चर्चगेट मार्गावरील प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. रेल्वे प्रशासनाकडून ओव्हरहेड वायर दुरुस्तीचे काम तातडीने हाती घेण्यात आले असून वाहतूक पूर्वपदावर आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत.