
हिंदुस्थानचा २० वर्षीय युवा शटलर आयुष शेट्टी याने बॅडमिंटन आशिया अजिंक्यपद स्पर्धेत मोठा उलटफेर घडवत इतिहास घडविला. त्याने जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानी असलेल्या कुनलावुत वितिदसार्न याचा पराभव करून अंतिम फेरीत प्रवेश केला. निंगबो ऑलिम्पिक स्पोर्ट्स सेंटर येथे खेळल्या गेलेल्या उपांत्य सामन्यात आयुषने जबरदस्त पुनरागमन करत १०-२१, २१-१९, २१-१७ अशी ७५ मिनिटांत विजय नोंदवला. तणावपूर्ण क्षणी त्याने दाखवलेला संयम आणि कौशल्य लक्षणीय ठरले.
मागील पराभवाचा बदला
या दोन्ही खेळाडूंची यापूर्वी आर्क्टिक ओपन स्पर्धेत गाठ पडली होती, तेव्हा वितिदसार्नने सरळ गेममध्ये विजय मिळवला होता. मात्र, यावेळी आयुषने पराभवाची परतफेड करत शानदार पुनरागमन केले. पहिला गेम गमावल्यानंतर त्याने दाखवलेली मानसिक ताकद विशेष ठरली.
दमदार फॉर्म कायम
जागतिक क्रमवारीत २५व्या स्थानावर असलेल्या आयुषचा हा प्रवास प्रभावी ठरला आहे. उपांत्यपूर्व फेरीत त्याने जोनाथन क्रिस्टी याला २३-२१, २१-१७ असे पराभूत केले. याशिवाय चिन यू जेन आणि ली शी फेंग यांसारख्या बलाढ्य प्रतिस्पध्र्थ्यांनाही त्याने नमवले. अंतिम सामन्यात त्याचा सामना चाऊ तियेन चेन आणि शी यूकी यांच्यातील विजेत्याशी होणार आहे.
इतर हिंदुस्थानी खेळाडूंची निराशाजनक कामगिरी
या स्पर्धेत हिंदुस्थानच्या अन्य खेळाडूंना अपेक्षित यश मिळाले नाही. पी.व्ही. सिंधू हिला दुसऱ्या फेरीत पराभव स्वीकारावा लागला, तर लक्ष्य सेन पहिल्याच फेरीत स्पर्धेबाहेर पडला.
५९ वर्षांनंतर घडला इतिहास
आयुष शेट्टी हा या प्रतिष्ठेच्या स्पर्धेच्या अंतिम फेरीत पोहोचणारा हिंदुस्थानचा दुसरा पुरुष एकेरी खेळाडू ठरला आहे. तब्बल ५९ वर्षांनंतर ही कामगिरी घडली आहे. यापूर्वी दिनेश खन्ना यांनी १९६५ मध्ये सुवर्णपदक जिंकले होते. तसेच २०१८ मध्ये एच. एस. प्रणॉयने कांस्यपदक पटकावले होते. आयुषने किमान रौप्यपदक निश्चित केले असून, त्याची नजर आता सुवर्णपदकावर आहे.



























































