
संजू सॅमसनच्या नाबाद शतकी खेळीच्या जोरावर चेन्नई सुपर किंग्जने दिल्ली कॅपिटल्सचा २३ धावांनी पराभव करीत आयपीएल टी-२० क्रिकेट स्पर्धेत अखेर विजयाचे दार उघडले.
चेन्नईकडून मिळालेल्या २१३ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना दिल्लीचा डाव १८९ धावांवर संपुष्टात आला. त्यांच्याकडून पथून निस्संका (४१) व मधल्या फळीतील ट्रिस्टन स्टब्ज (६०) वगळता इतर फलंदाजांनी निराशा केली. स्टब्ज बाद झाल्यानंतर दिल्ली विजयाच्या आशा मावळल्या. चेन्नईकडून जेमी ओव्हरटनने ४, तर अंशुल कंबोजने ३ फलंदाज बाद केले. त्याआधी, नाणेफेक गमावून प्रथम फलंदाजी करताना चेन्नई सुपर किंग्जने २ बाद २१२ धावसंख्या उभारली. सलामीवीर संजू सॅमसनने या स्पर्धेतील पहिले शतक ठोकले. त्याने ५६ चेंडूंत १५ चौकार व ४ षटकारांसह आपली नाबाद ११५ धावांची खेळी सजविली. कर्णधार ऋतुराज गायकवाड १५ धावांवर बाद झाल्यानंतर आयुष म्हात्रेने ३६ चेंडूंत ४ षटकार व ३ चौकारांसह ५९ धावा करीत संजूला चांगली साथ दिली; त्यानंतर शिवम दुबेने १० चेंडूंत एक षटकार व २ चौकारांसह नाबाद २० धावा केल्या. दिल्लीकडून अक्षर पटेलने एकमेव बळी टिपला.



























































