
सध्या आखाती देशांमधील युद्ध थांबवण्यासाठी पाकिस्तानमधील इस्लामाबाद येथे महत्त्वाची चर्चा सुरू आहे. या जागतिक घडामोडीवर भाष्य करताना शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, खासदार संजय राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर बोचरी टीका केली आहे. पाकिस्तानसारख्या देशाला आपण ‘अडाणी’ म्हणतो, पण जागतिक कार्यक्रमांचे भान कसे ठेवावे हे त्यांनी दाखवून दिले आहे, असे राऊत यावेळी म्हणाले.
संजय राऊत यांनी रविवारी मुंबईत माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, इस्लामाबादमध्ये सुरू असलेल्या जागतिक चर्चेच्या ठिकाणी कोणत्याही बॅनरवर पाकिस्तानचे पंतप्रधान, मंत्री किंवा राजकीय नेत्यांचे फोटो नाहीत. तिथे केवळ विषयाला महत्त्व दिले जात आहे. याउलट, असा कार्यक्रम हिंदुस्थानात झाला असता, तर भाजपने त्याचा मोठा ‘तमाशा’ केला असता आणि सगळीकडे केवळ नेत्यांचीच होर्डिंगबाजी दिसली असती, असा टोला त्यांनी लगावला.
मुंबईतील जुन्या घटनांचा संदर्भ देत राऊत म्हणाले की, जेव्हा ब्रिटनचे पंतप्रधान किंवा जागतिक नेते मुंबईत आले होते, तेव्हा त्यांच्या स्वागताच्या बोर्डवर एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांचे फोटो असे लावले होते, जणू काही ब्रिटनचे पंतप्रधान बीकेसीमध्ये जाऊन शिंदे गटात प्रवेश करणार आहेत. जागतिक कार्यक्रमांचे भान ठेवले पाहिजे, असा सल्ला त्यांनी दिला.
पाकिस्तानच्या राज्यकर्त्यांनी जागतिक घडामोडींना राजकीय रंग न देता कशा प्रकारे शिस्तबद्ध चित्र उभे केले, याचा अभ्यास हिंदुस्थानींनी केला पाहिजे. ज्या पाकिस्तानला आपण अशिक्षित अडाणी म्हणतो, त्या पाकिस्तानने जागतिक घडामोडींच भान काय असतं ते दाखवलं. त्यामुळे मी किंवा माझ्यासारख्या अनेकांनी इस्लामाबाद टॉल्क हे तेवढ्यापुरतचं न घेऊन पाकिस्तानच्या राज्यकरर्त्यांनी कशा प्रकारे ते चित्र उभ केलं याचा अभ्यास करावा किंवा पाकिस्तानच्या राज्यकर्त्यांनी मोदींकडून शिकलं पाहिजे की , अशा घडामोडींमध्ये स्वत:ची होर्डिंगबाजी कशी करावी, असे उपरोधिक विधान राऊत यांनी केले.


























































