
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांचे रविवारी सकाळी मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात निधन झाले. त्या ९२ वर्षांच्या होत्या. आशा भोसले यांच्या सदाबहार गीतांनी आठ दशकांपासून रसिकांना मंत्रमुग्ध केले होते. आपल्या चिरतरुण आवाजाने अवघ्या जगाला भुरळ घालणाऱ्या आशा भोसले काळाच्या पडद्याआड गेल्याने सिनेसृष्टीवर शोककळा पसरली आहे. शनिवारी रात्री त्यांना अस्वस्थ वाटू लागल्याने ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.
रविवारी सकाळी आशा भोसले यांचे पुत्र आनंद भोसले यांनी यासंदर्भातील माहिती दिली. तसेच उद्या (13 एप्रिल) दुपारी ४ वाजता आशा भोसले यांच्या पार्थिवावर दादर येथील छत्रपती शिवाजी महाराज स्मशानभूमी येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. त्यांच्या निधनाने हिंदी चित्रपटसृष्टी, गायन क्षेत्र आणि कला क्षेत्रावर शोककळा पसरली आहे. विविध क्षेत्रातील मान्यवरांनी सोशल मीडियावरून त्यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे. तर सोशल मीडियावर चाहत्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. अनेकांच्या स्टेटसवर आशाताईंना श्रद्धांजली वाहणारे पोस्टर्स पाहायला मिळत आहे.

























































