प्रचंड भीती, थरथरणारे पाय अन् 82 वर्षांपूर्वी उमटलेला ‘तो’ सूर; आशा भोसले यांनी गायलेल्या पहिल्या गाण्याचा रंजक किस्सा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

हिंदुस्थानी संगीत विश्वातील अष्टपैलू आवाजाची जादू आज कायमची शांत झाली आहे. ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांचे वयाच्या 92 व्या वर्षी मुंबईत निधन झाले. ब्रीच कँडी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते, मात्र आज सकाळी त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या जाण्याने केवळ सिनेसृष्टीचेच नव्हे, तर जगभरातील संगीतप्रेमींचे कधीही न भरून निघणारे नुकसान झाले आहे.

पहिल्या गाण्याचा रंजक किस्सा
8 सप्टेंबर 1933 रोजी सांगलीत जन्मलेल्या आशा भोसले यांनी आपला सांगीतिक प्रवास अत्यंत संघर्षातून आणि रंजक पद्धतीने सुरू केला. एका कार्यक्रमात त्यांनी आपल्या पहिल्या गाण्याचा किस्सा सांगितला होता. 1943 साली कोल्हापुरात वयाच्या १० व्या वर्षी मी पहिले गाणे गायले. त्यावेळी मी खूप घाबरले होते. मी अक्षरश: थरथर कापत होते. असे वाटले की हा माईक सोडून पळून जावे. पण, जर पळून गेले असते तर घरच्यांनी मला मारले असते, या एकाच भीतीपोटी मी तिथे गायले.” याच भीतीतून जन्मलेला तो सूर पुढे जाऊन जगावर राज्य करेल याची कल्पना तेव्हा कोणालाही नव्हती. 1943 मध्ये ‘माझा बाळ’ या मराठी चित्रपटातील ‘चला चला नव बाला’ या गाण्याने त्यांच्या कारकिर्दीचा श्रीगणेशा झाला.

तरुणांना लाजवेल असा उत्साह

वयाची नव्वदी ओलांडल्यानंतरही आशा ताईंचा उत्साह तरुणांना लाजवणारा होता. वयाच्या 91 व्या वर्षी त्यांनी आपली नात जनाई भोसले हिच्यासोबत ‘सैंया बिना’ हे गाणे रेकॉर्ड केले होते. हे गाणे सोशल मीडियावर प्रचंड गाजले. शेवटच्या क्षणापर्यंत त्यांची कलेवरची निष्ठा कायम होती.

गिनीज बुकमध्ये नोंद आणि अफाट कार्य
आशा भोसले यांनी आपल्या कारकिर्दीत 12 हजारांहून अधिक गाणी गाऊन जागतिक विक्रम प्रस्थापित केला आहे. 1946 मध्ये हिंदी फिल्म लाईनमध्ये पदार्पण केल्यानंतर 1948 च्या ‘चुनरिया’ आणि 1949 च्या ‘रात की रानी’ या चित्रपटांनी त्यांना खरी ओळख मिळवून दिली. शास्त्रीय संगीत, गझल, लावणी, पॉप आणि डिस्को अशा प्रत्येक शैलीत त्यांनी आपला वेगळा ठसा उमटवला. त्यांच्या या अफाट कार्याची दखल घेत ‘गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्स’मध्ये त्यांच्या नावाची नोंद करण्यात आली आहे.

एक पर्व संपले…

दरम्यान, लता दीदींनंतर आशा ताईंच्या रूपाने हिंदुस्थानी संगीताचा जो एक भक्कम आधारस्तंभ होता तो आज कोसळला आहे. सोमवारी त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. मुंबईतील छत्रपती शिवाजी पार्क येथे त्यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार होतील.