जिंदादिल व्यक्तिमत्व हरपलं; मुख्यमंत्री फडणवीस यांची आशाताईंना श्रद्धांजली

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

ज्येष्ठ गायिका आशाताई भोसले यांच्या निधनाने संगीत विश्वातील बुलंद आवाजाचे पर्व आज संपले आहे. मंगेशकर कुटुंबातील दुसरा तारा आणि अत्यंत जिंदादिल व्यक्तिमत्व हरपले आहे, अशा शब्दात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आशाताईंना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली. आशाताईंच्या गायन कलेतील वैशिष्ट्ये, बदल स्वीकारण्याची त्यांच्या व्यक्तिमत्वातील सहजता फडणवीस यांनी यावेळी सांगितली. तसेच आकाशवाणीवरील कार्यक्रमावेळच्या आठवणींना उजाळा दिला.

मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, “ही अतिशय दुःखद घटना आहे. मंगेशकर कुटुंबीयातील दुसरा तारा आशाताई भोसले यांचे दुःखद निधन झाले. 92 वर्षे त्या जगल्या, त्यातील बहुतांश काळ म्हणजे वयाच्या 5 व्या वर्षापासून त्यांनी संगीताची सेवा केली, ती अखेरच्या श्वासापर्यंत. या देशात सर्वात अष्टपैलू गायिका म्हणून जर कोणाकडे पाहायचे असेल तर त्या आशाताई होत्या, असे फडणवीस म्हणाले.

आशाताईंच्या गायकीच्या वैविध्याबद्दल बोलताना मुख्यमंत्री म्हणाले, “आशाताईंनी ‘तोरा मन दर्पण कहलाए’ अशा प्रकारचे शास्त्रीय संगीत म्हटले आणि त्याच वेळी अतिशय आधुनिक ‘खतुबा’ सारखे गाणे देखील तेवढ्याच लीलया गायले. शास्त्रीय संगीत, पॉप, रॉक, भावगीते असो सगळ्याच प्रकारात त्यांनी आपले कसब दाखवले. त्यांनी 20 पेक्षा जास्त भाषांमध्ये गाणी म्हटली. वयाच्या 90 व्या वर्षी ३ तास कॉन्सर्ट करणाऱ्या त्या एकमेव होत्या.

महाराष्ट्र भूषण पुरस्काराची आठवण
“आम्ही जेव्हा त्यांना ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्कार दिला, त्यावेळी त्यांनी आपल्या जीवनाचा प्रवास उलगडला. किती खडतर आयुष्य जगत त्या इथपर्यंत पोहोचल्या, हे अत्यंत प्रेरणादायी होते,” असेही मुख्यमंत्र्यांनी नमूद केले.

आशाताईंच्या स्वभावाचे वर्णन करताना फडणवीस म्हणाले की, त्या अतिशय जिंदादिल व्यक्तिमत्वाच्या होत्या. कोणत्याही कार्यक्रमात त्या आकर्षणाचे केंद्र असायच्या. 92 व्या वर्षीदेखील त्यांचा उत्साह वाखाणण्याजोगा होता, असे त्यांनी सांगितले.

लता दीदींची 100 वी आम्ही करू शकलो नाही पण आशाताईंची 100 वी निश्चित करू शकू अशी आम्हाला खात्री होती. पण दुर्दैवाने काळाने ती संधी दिली नाही. आशाताईंसारख्या सुविख्यात जगप्रसिद्ध, ईश्वरी आवाज असलेल्या गायीका आमच्यातून निघून गेल्या. मी त्यांनी विनम्र श्रद्धांजली अर्पण करतो. त्याच्या कुटुंबीयांच्या दु:खात आम्ही सामील आहोत, असे म्हणत त्यांनी श्रद्धांजली अर्पण केली.

आशाताईंच निधन सगळ्यांच्या मनावर आघात करणारं- नितीन गडकरी
आपण आज अशा गायिकेला मुकलो जिने आपल्या देशाचं नाव संपूर्ण विश्वात प्रसिद्ध केलं, अशा शब्दात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी आशा भोसले यांना श्रद्धांजली वाहिली. ते म्हणाले की, आशाताईंनी अनेक भाषांमधून अनेक गीते गायिली. ती गाणी आजही आपल्या सगळ्यांच्या स्ममरणात आहेत आणि भविष्यातही राहतील. आशाताईंचा आणि माझा अतिशय जवळचा परिचय होता. मला जेव्हा 61 वर्ष पूर्ण झाली तेव्हा मुंबईत झालेल्या कार्यक्रमात त्या आल्या होत्या. आणि त्यावेळी त्यांनी स्वत: त्या कार्यक्रमात गाणं गायलं. आणि मला आशीर्वाद दिले. त्यांच्या मृत्यूने आपण आज अशा गायिकेला मुकलो की जिने आपल्या देशाचं नाव संपूर्ण विश्वात प्रसिद्ध केलं. त्यांच दु:खद निधन आपल्या सगळ्यांच्या मनावर आघात करणारं आहे. परमेश्वर त्यांच्या कुटुंबीयांना हे दु:ख सहन करण्याची शक्ती देवो हीच प्रार्थना करतो, असे ते यावेळी म्हणाले.