
मुंबई शहर आणि उपनगरांत पुन्हा उष्णतेच्या झळा सुरू आहेत. मागील काही दिवस सरासरीच्या पातळीवर राहिलेल्या कमाल तापमानात रविवारी सलग दुसऱ्या दिवशी मोठी वाढ झाली. याच वेळी हवेची गुणवत्ताही घसरून प्रदूषणात वाढ झाली. येत्या दिवसांत उष्णतेत आणखी वाढ होण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.
मार्चमध्ये कहर केलेल्या उष्णतेची तीव्रता एप्रिलच्या पहिल्या आठवडय़ात कमी झाली होती. मात्र दुसऱया आठवडय़ात तापमानात वाढ झाली. शनिवारी सांताक्रूझमध्ये 35 अंश कमाल तापमान नोंदवले गेले. तापमानाने अचानक सरासरी ओलांडून थेट 35 अंशांची पातळी गाठल्याने नागरिकांना अस्वस्थ वाटू लागले. केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या समीर अॅपच्या आकडेवारीनुसार, शहराचा हवा गुणवत्ता निर्देशांक (एक्यूआय) 111 अंक इतका नोंद झाला. प्रदूषणातील वाढ फुप्फुस व हृदयाशी संबंधित आजारांनी त्रस्त असलेल्या नागरिकांसाठी चिंतेचा विषय बनली आहे.
शहरातील अनेक भागांत हवेची गुणवत्ता खराब
मुंबईच्या अनेक भागांत रविवारी हवेची गुणवत्ता खराब होती. देवनारमध्ये सर्वाधिक प्रदूषित हवा होती. तेथे 179 एक्यूआयची नोंद झाली. तसेच वांद्रे-कुर्ला संकुल येथे 165, अंधेरीत 153, बोरिवली पूर्व येथे 126, भायखळा येथे 115 आणि चेंबूरमध्ये 107 इतक्या एक्यूआयची नोंद झाली.
बांधकामांमुळे धूलिकण वाढले
उच्च न्यायालयाने कठोर निर्देश दिल्यानंतर बांधकाम प्रकल्पांच्या ठिकाणी निर्बंध आखून दिले होते. त्यानंतर प्रदूषणात घट झाली होती. पुन्हा धूलिकण वाढल्याने बांधकाम प्रकल्पांच्या ठिकाणी खबरदारीच्या उपायांकडे कानाडोळा केला जातोय का? असा प्रश्न उपस्थित होत असून त्याकडे सरकारने लक्ष देण्याची मागणी होत आहे.
राज्याच्या ग्रामीण भागात सूर्य आग ओकू लागला
ग्रामीण भागात उष्णतेत मोठी वाढ झाली आहे. रविवारी जळगाव, मालेगावमध्ये 41.4 अंश कमाल तापमानाची नोंद झाली. त्यापाठोपाठ सोलापूरमध्ये 41, सांगलीत 40.3 आणि जेऊरमध्ये 40 अंश कमाल तापमान नोंदवले गेले. महाबळेश्वरमध्येही तापमानात 3 अंशांची वाढ झाली.



























































