
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची ई-केवायसी करून देण्यासाठी लाभार्थी महिलांकडे शरीरसुखाची मागणी केली जात असल्याचा धक्कादायक प्रकार जळगावात समोर आला आहे. या प्रकारानंतर संतापाची लाट उसळली असून महिला व बालकल्याण मंत्र्यांचे याकडे लक्ष आहे का असा सवाल केला जात आहे.
जळगावात गोकुळ रमेश चव्हाण या व्यक्तीने लाडकी बहीण योजनेसाठी लागणारी कागदपत्रे गोळा करण्याच्या बहाण्याने लाभार्थी महिलेचे घर गाठले आणि ई-केवायसी करून देण्यासाठी शरीरसुखाची मागणी केली. याप्रकरणी सदरहू महिलने तक्रार केल्यानंतर पोलिसांनी गुन्हा नोंदवून चौकशी सुरू केली आहे.
राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्षा रोहिणी खडसे यांनी या प्रकारावरून सरकारवर टीका केली आहे. जळगावात अशा दोन घटना समोर आल्या असून महिला व बालकल्याणमंत्री आदिती तटकरे स्वतःचा पाठ थोपटून घेण्यातून वेळ मिळाला असेल तर याकडे लक्ष द्या, असे रोहिणी खडसे यांनी ट्विटरवर केलेल्या पोस्टमध्ये म्हटले आहे.
आमिषांना बळी पडू नका – आदिती तटकरे
आदिती तटकरे यांनी यासंदर्भात स्पष्टीकरण दिले आहे. जळगावात घडलेल्या घटनांची कबुली त्यांनी दिली आहे. लाडकी बहीण योजनेसाठी नव्याने नोंदणी प्रक्रिया बंद करण्यात आलेली आहे. परंतु ई-केवायसी करताना झालेल्या चुका दुरूस्त करण्यासाठी 30 एप्रिलपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. महिला स्वतः मोबाईलवरून ई-केवायसी करू शकतात किंवा त्यासाठी अंगणवाडी सेविकांची मदत घेऊ शकतात. या प्रक्रियेसाठी कोणत्याही मध्यस्थाची गरज नाही, असे आदिती तटकरे यांनी म्हटले आहे.



























































