PSL चा तिळपापड! IPL ला पसंती दिल्यामुळे झिम्बाब्वेचा वेगवान गोलंदाज ब्लेसिंग मुजरबानीवर केली कारवाई

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

झिम्बाब्वेचा स्टार वेगवान गोलंदाज ब्लेसिंग मुजरबानीने पाकिस्तान सुपर लीगला (PSL) डावलून IPL ला पसंती दिल्यामुळे त्याच्यावर दोन वर्षांची बंदी घालण्यात आली आहे. पीएसएलशी करारबद्ध असूनही तो मोडून आयपीएलमध्ये (IPL) सहभागी झाल्यामुळे त्याच्यावर कारवाई करण्यात आली आहे. मुजरबानीला सुरुवातीला इस्लामाबाद युनायटेडने बदली खेळाडू म्हणून संघात घेतले होते, मात्र कोलकाता नाईट रायडर्सने (KKR) बांगलादेशच्या मुस्तफिजुर रहमानच्या जागी विचारणा करताच त्याने पीएसएलचा करार अर्ध्यावर सोडला.

मुजरबानीने केकेआरसाठी खेळताना आतापर्यंत चमकदार कामगिरी केली असून सनरायझर्स हैदराबादविरुद्ध त्याने 41 धावांत 4 विकेट घेतल्या आहेत. मात्र, त्याच्या या निर्णयावर पीएसएलने तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. लीगने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, “फ्रँचायझी क्रिकेटमध्ये खेळाडूंनी पारदर्शकता आणि व्यावसायिकता पाळणे आवश्यक आहे. अस्तित्वात असलेला करार मोडून दुसऱ्या लीगला पसंती देणे हे खेळाच्या शिस्तीला धरून नाही. अशा वागणुकीमुळे फ्रँचायझी आणि भागधारकांचा विश्वास कमी होतो.”

मुजरबानीवर घातलेली ही दोन वर्षांची बंदी त्याच्या कराराच्या उल्लंघनाचे गांभीर्य दर्शवणारी आहे. विशेष म्हणजे, अशाच प्रकारे करार मोडल्याबद्दल गेल्या हंगामात दक्षिण आफ्रिकेच्या कॉर्बिन बॉशवर एक वर्षाची बंदी घालण्यात आली होती. यावर्षी दासून शनाका आणि स्पेन्सर जॉन्सन यांनीही पीएसएलऐवजी इतर पर्यायांना पसंती दिली असून, त्यांच्यावरही लवकरच पीएसएलकडून अशाच स्वरूपाची कारवाई होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.