
शांतता चर्चा निष्फळ ठरल्याने होर्मुझची नाकेबंदी करून इराणचा व्यापारकोंडी करण्याच्या प्रयत्नात असलेल्या डोनाल्ड ट्रम्प यांना पहिल्याच दिवशी दणका बसला. अमेरिकेची नाकेबंदी झुगारून आज दोन देशांच्या जहाजांनी इंधन भरले आणि होर्मुझची सामुद्रधुनी सुरक्षित पार केली. दरम्यान, नाकेबंदी सुरू झाल्यापासून एकाही जहाजाने इराणच्या सागरी हद्दीत प्रवेश केला नसल्याचा दावा अमेरिकेने केला.
जगातील 20 टक्के इंधन वाहतुकीचा मार्ग असलेल्या होर्मुझ सामुद्रधुनीवर इराणचा ताबा आहे. त्याचाच वापर करून इराणने अमेरिका व इस्रायलला तब्बल 40 दिवस जेरीस आणले. कायमस्वरूपी युद्धबंदीसाठी अमेरिकेने ठेवलेल्या अटी सपशेल धुडकावून लावल्या. त्यामुळे खवळलेल्या ट्रम्प यांनी इराणच्या तेल व नैसर्गिक वायूच्या व्यापाराला लक्ष्य केले. इराणला जाणारी व तेथून येणारी जहाजे रोखण्याचा निर्णय जाहीर केला, मात्र तो अंगलट आला आहे.
नाकेबंदीच्या पहिल्याच दिवशी लायबेरियाचे ‘ख्रिस्टिना’ हे जहाज इराणच्या इमाम खोमेनी बंदरावर पोहोचले आणि तिथे मका उतरवला, तर कोमोरोजच्या ‘एलपीस’ या जहाजाने इराणच्या बंदरावर तेल भरले आणि नंतर होर्मुझ खाडी सुखरूप पार केली, अशी माहिती मेरिटाइम ट्रकिंग संस्था केप्लरने दिली आहे.
इटलीचा इस्रायलला दणका; संरक्षण करार रद्द केले!
इराणशी चर्चेसाठी जगभरातून अमेरिकेवर दबाव येत असताना इटलीने अमेरिकेचे मित्रराष्ट्र इस्रायलला आज मोठा दणका दिला. लेबनॉनमध्ये कार्यरत असलेल्या इटलीच्या शांतिदूतांवर हल्ल्याचा निषेध करत पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी इस्रायलसोबतचा संरक्षण करार रद्द केला. इस्रायल व इटलीमध्ये 2006 मध्ये हा करार झाला होता. लष्करी शस्त्रास्त्रs व तंत्रज्ञान देवाणघेवाणीशी संबंधित हा करार होता. दर पाच वर्षांनी त्यांचे नूतनीकरण होत असे. सध्याच्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर इटलीने हा करार स्थगित केला.
चर्चेची दुसरी फेरी गुरुवारपासून
अमेरिका व इराणमध्ये फिसकटलेली शांतता चर्चा गुरुवारपासून पुन्हा सुरू होणार आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी आज स्वतः तसे संकेत दिले. ही चर्चा इस्लामाबादमध्ये होईल असे ट्रम्प म्हणाले आहेत, मात्र त्यासाठी जिनिव्हाचा पर्यायदेखील विचारात घेतला जात आहे. सौदी, यूएईसह युरोपातील अनेक देशांकडून दबाव येत असल्यामुळे ट्रम्प चर्चेला तयार झाल्याचे समजते.






























































