अमेरिकन तळांना लक्ष्य करण्यासाठी इराणला चिनी बनावटीच्या सॅटेलाइटची मदत, गेल्यावर्षीच केली होती खरेदी: रिपोर्ट

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

इराणने गेल्या वर्षी घेतलेल्या एका चिनी बनावटीच्या सॅटेलाइटचा वापर आखातातील अमेरिकन लष्करी तळांच्या हालचाली टिपण्यासाठी केला आहे. ‘TEE-01B’ नावाचा हा उपग्रह चीनच्या ‘अर्थ आय कंपनी’ने विकसित आणि प्रक्षेपित केला होता, जो नंतर इराणच्या ‘इस्लामिक रिव्होल्युशनरी गार्ड कॉर्प्स’च्या (IRGC) एरोस्पेस फोर्सने विकत घेतला. ही कंपनी ‘इन-ऑर्बिट डिलिव्हरी’नावाच्या एका वेगळ्या निर्यात मॉडेलवर काम करते, ज्यामध्ये चीनमध्ये प्रक्षेपित केलेले अंतराळ यान कक्षेत यशस्वीरित्या पोहोचल्यानंतरच कंपनीच्या ग्राहकांकडे हस्तांतरित केले जाते. या अहवालानुसार, इराणी कमांडरनी या उपग्रहावर प्रदेशातील प्रमुख अमेरिकन लष्करी तळांवर लक्ष ठेवण्याची जबाबदारी सोपवली होती. या कराराचा भाग म्हणून, आयआरजीसीला बीजिंगमधील ‘एम्पोसॅट’ या सॅटेलाइट सेवा देणाऱ्या कंपनीच्या व्यावसायिक ग्राउंड स्टेशन्सच्या नेटवर्कचा अॅक्सेस देखील देण्यात आला होता, असे वृ्त्त ‘फायनान्शियल टाइम्स’ने दिले आहे.

या सॅटेलाइटने गु्प्तचराप्रमाणे काम करत १३, १४ आणि १५ मार्च रोजी सौदी अरेबियातील ‘प्रिन्स सुलतान एअर बेस’ची छायाचित्रे टिपली होती आणि त्यानंतर लगेचच १४ मार्च रोजी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी तिथे तैनात असलेल्या अमेरिकन विमानांचे नुकसान झाल्याची कबुली दिली होती. याव्यतिरिक्त, जॉर्डनमधील ‘मुवाफक साल्टी एअर बेस’, बहरीनमधील अमेरिकेच्या पाचव्या ताफ्याचे मुख्यालय आणि इराकमधील ‘एर्बिल’ विमानतळावरील हालचालींचा मागोवा देखील या सॅटेलाइटने घेतला होता. या सॅटेलाइटची पाळत केवळ लष्करी तळांपुरती मर्यादित नव्हती, तर कुवेतमधील ‘कॅम्प बुहरिंग’ आणि ‘अली अल सालेम एअर बेस’, जिबूतीमधील ‘कॅम्प लेमोनिअर’ आणि ओमानमधील ‘दुक्म’ आंतरराष्ट्रीय विमानतळ यांसारख्या अमेरिकेशी संबंधित सुविधांपर्यंत विस्तारलेली होती.

तसेच संयुक्त अरब अमिरातीमधील ‘खोर फक्कन’ कंटेनर पोर्ट, ‘किदफा’ ऊर्जा आणि पाणी शुद्धीकरण केंद्र आणि बहरीनचा जगातील सर्वात मोठ्या ॲल्युमिनियम प्रकल्पांपैकी एक असलेला ‘अल्बा’ प्लँट यांसारख्या नागरी पायाभूत सुविधांवरही या सॅटेलाइटद्वारे लक्ष ठेवण्यात आले होते.

एका माजी पाश्चात्य गुप्तचर अधिकाऱ्याने यावर भाष्य करताना सांगितले की, चीनमधील कोणत्याही प्रशासकीय परवानगीशिवाय एखादी चिनी कंपनी उपग्रह प्रक्षेपणासारखे पाऊल उचलणे अशक्य आहे, ज्यामुळे चीन सरकार आपला सहभाग लपवून इराणला अतिमहत्त्वाची संवेदनशील माहिती देऊन मदत करत असल्याचे स्पष्ट होते. इराणने शेजारील देशांवर वारंवार क्षेपणास्त्रे आणि ड्रोन हल्ले केले असताना चिनी सॅटेलाइटचा असा वापर झाल्यामुळे संपूर्ण आखाती देशांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. चीन या प्रदेशातील प्रमुख व्यापारी भागीदार आणि तेलाचा सर्वात मोठा खरेदीदार असल्याने ही बाब अधिक संवेदनशील बनली आहे.

दरम्यान, २८ फेब्रुवारी रोजी इराणमध्ये अमेरिका-इस्रायलचे हल्ले सुरू झाल्यानंतर इराणला रशियन सॅटेलाइटद्वारेही अमेरिकन आणि इस्रायली लक्ष्यांची गुप्तचर माहिती मिळाल्याचे संकेत आधीच्या अहवालांतून मिळाले होते.

चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाने मात्र इराणला कोणत्याही प्रकारचे लष्करी सहकार्य करत असल्याचा आरोप वारंवार फेटाळून लावला आहे.