लष्कर-ए-तोयबाचा दहशतवादी अमीर हमजावर जीवघेणा हल्ला, न्यूज चॅनेलच्या कार्यालयाबाहेर गोळीबार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

पाकिस्तान पुरस्कृत दहशतवादी संघटना लष्कर-ए-तोयबाचा संस्थापक सदस्य अमीर हमजा याच्यावर अज्ञात हल्लेखोरांनी गोळीबार केल्याचे वृत्त आहे. लाहोरमधील एका न्यूज चॅनेलच्या कार्यालयाबाहेर दबा धरून बसलेल्या हल्लेखोरांनी हमजावर अंदाधुंद गोळीबार केला. या हल्ल्यात तो गंभीर जखमी झाला असून त्याची प्रकृती अत्यंत चिंताजनक असल्याची माहिती आहे.

इंडिया टु़डेने दिलेल्या वृत्तानुसार, अमीर हमजा हा कुख्यात दहशतवादी हाफिज सईदचा जवळचा सहकारी असून त्याने सईदसोबत मिळून लष्कर-ए-तोयबाची स्थापना केली होती. हिंदुस्थानविरुद्ध झालेल्या अनेक दहशतवादी कारवायांमध्ये त्याचा थेट सहभाग असल्याचे मानले जाते. अफगाण मुजाहिद्दीनचा जुना कार्यकर्ता असलेला हमजा आपल्या भाषणांसाठी आणि लेखनासाठी ओळखला जातो. त्याने यापूर्वी लष्करच्या अधिकृत मासिकाचे संपादन केले असून जहाल विचारसरणीचा प्रचार आणि प्रसार करणारी अनेक पुस्तकेही लिहिली आहेत.

अमेरिकेच्या वित्त विभागाने लष्कर-ए-तोयबावर बंदी घातली असून अमीर हमजाला जागतिक दहशतवादी म्हणून घोषित केले आहे. संघटनेसाठी निधी गोळा करणे, दहशतवादी कारवायांसाठी तरुणांची भरती करणे आणि अटक केलेल्या दहशतवाद्यांच्या सुटकेसाठी वाटाघाटी करणे अशा महत्त्वाच्या जबाबदाऱ्या तो पार पाडत असे. 2018 मध्ये पाकिस्तान सरकारने लष्करच्या संबंधित संस्थांवर कारवाई केल्यानंतर, त्याने स्वतःला मुख्य संघटनेपासून दूर करून ‘जैश-ए-मन्कफा’ नावाचा एक नवा गट स्थापन केला होता.

प्रसारमाध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार, हमजाचा हा नवा गट पाकिस्तानात सक्रिय आहे आणि तो अजूनही लष्करच्या वरिष्ठ नेत्यांच्या संपर्कात आहे. जम्मू-काश्मीरमधील दहशतवादी कारवायांमध्ये या गटाचा सहभाग असल्याचा संशय व्यक्त केला जात आहेत. हमजावर झालेला हा हल्ला पाकिस्तानातील अंतर्गत संघर्षातून झाला की अन्य काही कारणामुळे, याचा तपास सध्या सुरू आहे.