ईडीची भीती दाखवून बँक खात्यावर डल्ला

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

ईडीची भीती दाखवून ठगाने वृद्ध महिलेच्या बँक खात्यातून 7 लाख 70 हजार रुपये काढल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी नवघर पोलिसांनी तिघांविरोधात गुन्हा नोंद केला आहे.

गेल्या काही दिवसांपासून केंद्रीय यंत्रणांच्या नावाखाली वृद्धाची फसवणूक केल्याच्या घटना वाढत चालल्या आहेत. अशीच एक घटना नवघर येथे घडली. तक्रारदार या ज्येष्ठ नागरिक असून त्या मुलुंड येथे राहतात. 9 एप्रिलला त्या घरी होत्या. तेव्हा त्यांना एका नंबरवरून फोन आला. फोनवर बोलणाऱ्याने तो ईडी कार्यालयातून बोलत असल्याचे भासवले. तुमच्या बँक खात्यात अडीच कोटी रुपये जमा झाले आहेत. त्या पैशांचा वापर हा टेरर फंडिंगसाठी झाल्याच्या भूलथापा मारल्या. त्यानंतर महिलेच्या मोबाईलवर ईडीची नोटीस पाठवली.

राष्ट्रीय तपास पथकाने (एनआयए) 247 एटीएम कार्ड एकाच्या घरातून जप्त केले आहे. त्यात तुमचे कार्ड आढळून आल्याने नोटीस पाठवल्याचे त्याना सांगण्यात आले. त्या प्रकरणात डिजिटल अटक केली जाणार असल्याचे सांगून त्याना एक व्हॉट्सअॅपवर मेसेज पाठवला. ठगाने त्याच्याकडून बँक खात्याची माहिती घेतली. अटक टाळायची असल्यास खात्यात 7 लाख 70 हजार रुपये पाठवावे लागतील असे त्यांना सांगितले. तेव्हा तक्रारदार या एकटय़ाच घरी होत्या. त्यामुळे त्या प्रचंड घाबरल्या. अटक होऊ नये म्हणून त्यानी पैसे पाठवण्यास होकार दिला. होकार दिल्यावर एका ठराविकच खात्यात पैसे पाठवावे अशी तंबी दिली.

  • गेल्या आठवडय़ात त्यांना पुन्हा एका नंबरवरून फोन आला. जर पैसे पाठवले नाहीत तर घरी येऊन अटक करू अशी भीती दाखवली.