
वंदे भारत एक्प्रेसचा डबा पुणे स्थानकात घसरल्यानंतर जवळपास 4 तास सर्व प्रवासी पुणे स्थानकावरच खोळंबले होते. रात्री उशिरा त्यांना वेगळ्या रेकने सोलापूरकडे रवाना करण्यात आले.
प्लॅटफॉर्मजवळच डबा घसरल्यामुळे रेल्वे वाहतुकीवर परिणाम झाला. रेल्वे प्रशासनाने तत्काळ दुरुस्तीचे काम हाती घेत डबा पुन्हा रुळावर आणण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते. गाडीमध्ये सोलापूरला जाणारे सुमारे 400 ते 450 प्रवासी होते. त्यांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागला. अनेक प्रवासी आपले सामान घेऊन रेल्वे रुळांवरच चालत जाऊन प्लॅटफॉर्मवर पोहोचले. वंदे भारतमध्ये जेवणाची सोय केली जाते. त्यामुळे या प्रवाशांच्या जेवणाची सोय करण्यात आल्याची माहिती मध्य रेल्वेच्या जनसंपर्क विभागानो दिली. नेहमी प्रवाशांचे सामान वाहून नेण्यासाठी शुल्क घेणारे हमाल आज मात्र मदतीसाठी पुढे सरसावले. कोणतेही मानधन न घेता त्यांनी प्रवाशांना मदत केली.
ज्या डायमंड क्रॉसिंगवर हा अपघात झाला, त्या क्रॉसिंगच्या अद्यावतीकरणाचे काम पुणे स्थानकाच्या ‘यार्ड रिमॉडेलिंग’ प्रकल्पांतर्गत आधीच नियोजित आहे. हे काम प्रलंबित असतानाच हा अपघात घडल्याने रेल्वेच्या पायाभूत सुविधांच्या देखभालीवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.


























































