दुरुस्तीनंतर अवघ्या दोन तासांत वाहतूक सुरू होणार, रस्ते डागडुजीसाठी मायक्रो सर्फेसिंग तंत्रज्ञान; पूर्व, पश्चिम महामार्गाच्या खड्डेमुक्तीसाठी 165 कोटींचा खर्च

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

पावसाळ्यात मुंबईकरांचा प्रवास खड्डेमुक्त होण्यासाठी पालिका अत्याधुनिक तंत्रज्ञान वापरत असून दुरुस्तीनंतर अवघ्या दोन तासांत संबंधित रस्त्यावर वाहतूक सुरू करता येणार आहे. यासाठी पालिका मायक्रो सर्फेसिंग तंत्रज्ञान वापरणार आहे. पूर्व आणि पश्चिम द्रुतगती महामार्गाची दुरुस्ती या तंत्रज्ञानाने करण्यात येणार असून यासाठी पालिका 164 कोटी 94 लाख 65 हजार 994 रुपयांचा खर्च करणार आहे.

पालिकेच्या हद्दीतील पश्चिम द्रुतगती महामार्ग मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडून मुंबई महानगरपालिकेस सुधारणा व देखभाल करण्यासाठी ‘आहे तशा स्थितीत’ 3 ऑक्टोबर 2022 रोजी हस्तांतरीत करण्यात आलेला आहे. पश्चिम द्रुतगती महामार्ग हस्तांतरित केलेल्या समस्त पुलांपैकी वाकोला पूल, आरे पूल, दत्तपाडा पूल, राष्ट्रीय उद्यान पूल व रावळपाडा पूल या पुलांची व इतर दुरवस्था झालेल्या पृष्ठभागाची मास्टिक वापरून सुधारणा करणे आदी कामे मान्सूनपूर्व तयारीअंतर्गत सद्यस्थितीत चालू आहेत. तसेच पश्चिम द्रुतगती महामार्गावरील मुख्य रस्त्यावरील दुरवस्था झालेल्या पृष्ठभागाचे मायक्रो सर्फेसिंग तंत्रज्ञानाचा वापर करून सुधारणा करण्यात येणार आहे. पश्चिम द्रुतगती महामार्ग खड्डेमुक्त करण्यासाठी 87 कोटी 80 लाख 36 हजार 021 रुपये खर्च करण्यात येणार आहे. बुधवार, 6 मे रोजी होणाऱ्या स्थायी समितीच्या बैठकीत प्रस्ताव मंजुरीसाठी सादर करण्यात येणार आहे.

असे होणार काम

 पश्चिम द्रुतगती महामार्ग 26 किमी, तर पूर्व द्रुतगती महामार्गाची लांबी 19 किमी आहे. पूर्व द्रुतगती महामार्गावर पुर्ला पूल, छेडा नगर पूल, एस. सी. एल.आर. पूल, घाटकोपर पूल, विक्रोळी पूल, जे. व्ही. एल. आर. पूल, ऐरोली जंक्शन पूल या पुलांची व इतर दुरवस्था झालेल्या पृष्ठभागाची मास्टिक वापरून सुधारणा सुरू आहे.

 तसेच पूर्व द्रुतगती महामार्गावरील मुख्य रस्त्यावरील दुरवस्था झालेल्या पृष्ठभागाचे मायक्रो सर्फेसिंग टेक्निकचा वापर करून सुधारणा करण्यात येणार आहे. पूर्व द्रुतगती महामार्ग खड्डेमुक्त करण्यासाठी 77 कोटी 14 लाख 29 हजार 973 रुपये खर्च करण्यात येणार आहे.