भ्रमंती – सह्याद्रीतील गड प्रदक्षिणा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> स्वप्नील साळसकर, [email protected]

दाट जंगल, उंच कडे, नागमोडी वाटा, प्रत्येक वळणावर दिसणारे सह्याद्रीचे रौद्ररूप यामधून मार्ग काढताना मनात इतिहासाबद्दल अभिमान जागा होतो. कुडाळ तालुक्यातील मनोहर, मनसंतोष हे दोन गड त्यातीलच एक. या गडाची तीन वेळा अर्धी राहिलेली प्रदक्षिणा करताना सह्याद्रीच्या प्रेमाचा अविस्मरणीय अनुभव दुर्ग मावळा प्रतिष्ठानचे अध्यक्ष गणेश नाईक यांनी कथन केला.

सह्याद्रीच्या विशाल कुशीत दिमाखात उभे असलेले मनोहर आणि मनसंतोष हे जोडगड केवळ दगड-मातीचे दुर्ग नसून मराठय़ांच्या शौर्यगाथेचे अजरामर प्रतीक आहेत. इतिहासाच्या पानांत असा उल्लेख आढळतो की, छत्रपती शिवाजी महाराजांनी मनोहरगडावर तब्बल 34 दिवस वास्तव्य केले होते. त्यामुळे या गडाचे ऐतिहासिक महत्त्व अधिकच अधोरेखित होते.

अशा पावन भूमीची प्रदक्षिणा म्हणजे शिवरायांच्या पावलांचा मागोवा घेत इतिहासाशी संवाद साधण्याचा एक पवित्र अनुभव असल्याचे नाईक सांगतात. मनोहर-मनसंतोष गडाची प्रदक्षिणा अधिक वेगळा आणि संस्मरणीय अनुभव देणारी ठरेल असे वाटले अन् या गडापासूनच दुर्ग मावळा परिवाराचे सिंधुदुर्ग जिह्यातील दुर्गसंवर्धनाचे कार्य सुरू झाले. ‘मनसंतोष गडापर्यंत यापूर्वी तीन वेळा जाणे झाले असल्याने अर्धा प्रदक्षिणा मार्ग परिचित होता. मात्र पुढील मार्ग अपरिचित आणि दाट जंगलातून जाणारा असण्याची शक्यता होती.’

या मोहिमेसाठी रोहन आणि लक्ष्मण गोसावी यांचे वेळापत्रक जुळवत गणेश नाईक यांनी मोहिमेची तारीख, वेळ निश्चित केली. मनोहर-मनसंतोष गडावरील संभाव्य परिस्थिती लक्षात घेऊन पूर्वतयारी करण्यात आली. गवारेडे, बिबटय़ा यांसारखे वन्यप्राणी आणि मुख्यत गडाच्या कपाऱयांमध्ये असलेला मधमाश्यांचा अधिवास यांचा विचार करून नियोजन करण्यात आले. गिर्यारोहण साहित्य सोबत घेत नाईक आणि त्यांच्या सहकाऱयांचा शिरशिंगे-गोठवेवाडीमार्गे प्रवास सुरू झाला.

शिवापूरकडील रस्त्याच्या तुलनेत हा नवीन मार्ग कमी चढणीचा असल्याने जलदगतीने गडाच्या पायथ्याशी पोहोचता आले. ‘बाजार आंबा’ येथे पोहोचल्यानंतर काही अंतर पुढे गेल्यावर मनोहरगडाच्या पायऱया सुरू होतात. येथे दुर्गपूजा करून प्रदक्षिणेला प्रारंभ होतो. शिरशिंगेकडील गडाचा भव्य कडा सुरू होतो. येथून आंबोली घाट, महादेवगड, नारायणगड, कावळेसाद पॉइंट आणि म्हातारीचा कडा स्पष्ट दिसतो.

मनोहर-मनसंतोष गडांच्या मधल्या खिंडीत पोहोचल्यावर मनोहरगडाची अर्धी प्रदक्षिणा पूर्ण होते. त्यानंतर मनसंतोषगडाच्या पायऱया सुरू होतात. चढाईचा अनुभव व्यक्त करताना मनोहर नाईक सांगतात, ‘मनसंतोष गडावर पोहोचल्यावर मिळणारा आनंद शब्दांत व्यक्त करणे अशक्य आहे. या गडावरील ही तिसरी चढाई होती. प्रशिक्षित गिर्यारोहकाच्या मार्गदर्शनाखालीच या गडाची चढाई करणे अत्यंत आवश्यक आहे. मनसंतोषगडाची चढाई मोजक्याच दुर्गप्रेमींनी केलेली असल्याने ती संधी तीन वेळा मिळाल्याचा आनंद अधिकच होता.’

मनसंतोषगडाच्या उत्तर दिशेने पुढील मार्गक्रमण करताना मोठय़ा प्रमाणात कारवी असल्याने वाट काढत पुढे जावे लागते. मनोहरगडावरील झेंडा दिसू लागतो. दाट झाडीतून मार्ग काढत खिंडीत पोहोचता येते. इथे थोडी विश्रांती घेऊन मनोहरगडाची उर्वरित प्रदक्षिणा सुरु करता येते.

नाईक याबाबत सांगतात, ‘या भागात झाडे आणि ढगाळ वातावरण असल्याने उन्हाचा त्रास जाणवत नव्हता. मध्यावर एक नैसर्गिक गुहा लागली. कपारीसमोरून शिवापूर, वसोली, आंजीवडे ही गावे तसेच रांगणागड आणि हनुमंत घाट स्पष्ट दिसत होते. सह्याद्रीचे हे मनमोहक दृश्य पाहताना सर्व थकवा क्षणात दूर होतो.’

दोन्ही गडांची प्रदक्षिणा यापूर्वी कोणी पूर्ण केली की नाही हे ज्ञात नसले, तरी कोणत्याही अडथळ्याशिवाय या टीमने ही मोहीम यशस्वीरीत्या पूर्ण केली. ही प्रदक्षिणा फक्त गडाभोवतीचा प्रवास नव्हती, ती शिवरायांना वाहिलेली एक मानवंदना होती.