पालघरमधील साडेसहा हजार विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टळले, सामनाच्या बातमीनंतर प्रशासनाची पळापळ

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
फाईल फोटो

केंद्राच्या शिक्षणासाठी पगार देण्यासाठी पैसे नसल्याने ५० माध्यमिक शाळांमधील नववी व दहावीचे वर्ग बंद करण्याचा निर्णय पालघर जिल्हा परिषदेनं घेतला होता. याबाबतचे वृत्त दैनिक ‘सामना’मध्ये प्रसिद्ध होताच प्रशासनाची पळापळ झाली असून जिल्हा परिषदेनं आज तात्काळ हा निर्णय मागे घेतला आहे. दैनिक ‘सामना’च्या दणक्यामुळे पालघरमधील साडेसहा हजार विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टळले असून पालकांनीही सुटकेचा निःश्वास सोडला आहे. पुढील शैक्षणिक वर्षापासून जिल्हा परिषद शाळांमधील नववी, दहावीचे वर्ग नेहमीप्रमाणे सुरू राहणार आहेत. दुर्गम भागातील विद्यार्थ्यांची वणवण आता थांबणार आहे.

गटशिक्षणाधिकाऱ्यांना आदेश

झोडपचे मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज रानडे यांनी आज खास परिपत्रक काढले. नववी, दहावीचे वर्ग पुन्हा सुरू ठेवण्याबाबत पालघर, डहाणू, विक्रमगड, वाडा, तलासरी, जव्हार, मोखाडा, वसई येथील पंचायत समितीतील गटशिक्षण अधिकाऱ्यांना हे परिपत्रक पाठवून स्पष्ट निर्देश दिले.

पालघर जिल्ह्यातील माध्यमिक शाळांमधील साडेसहा हजार विद्यार्थी संख्या शिकत असून कंत्राटी तत्त्वावर ६८ शिक्षक काम करत आहेत. या शिक्षकांना सेस फंडातून जिल्हा परिषदेमार्फत दर महिन्याला आठ हजार रुपये एवढे मानधन दिले जात होते. पण सेस फंडातून पगार देणे शक्य नसल्याने कारण सांगत शिक्षण विभागाने नववी दहावीचे वर्ग बंद करण्याचे ठरवले होते.

त्यामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थी व पालकांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले. दैनिक ‘सामना’ने याबाबतचे वृत्त आज प्रसिद्ध करताच जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज रानडे यांनी त्याची त्वरित दखल घेतली. तसेच नववी, दहावीचे वर्ग बंद करण्याचा घेतलेला निर्णय मागे घेतला.

जिल्हा परिषदेनं वर्ग बंद करण्याचा निर्णय मागे घेतल्याने या निर्णयाचे स्वागत आहे. आता आमची मुले पुन्हा नववी, दहावीच्या वर्गात शिकू शकतील. दैनिक ‘सामना’ने हा प्रश्न उचलून धरला, त्याबद्दल आभार. — संजय बोबा (पालक)

जिल्हा परिषदेच्या शाळांमधील नववी, दहावीचे वर्ग कायम राहणार असल्याने मुलांची वणवण आता थांबणार आहे. तसेच विद्यार्थ्यांसह स्थानिक कंत्राटी शिक्षकांनाही दिलासा मिळणार आहे. – कैलास मलावकर (शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष)

नववी व दहावीचे वर्ग बंद करण्याचा निर्णय जाहीर केल्यानंतर विद्यार्थी व पालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. पुढील शैक्षणिक वर्षापासून या विद्यार्थ्यांना कोणत्या शाळेत जावे लागेल याची चिंता त्यांना त्रास देत होती. आता हा निर्णय मागे घेतल्याने मोठा दिलासा मिळाला आहे.