
संरक्षण संशोधन आणि विकास संस्था ‘डीआरडीओ’ने देशाच्या अतिशय महत्त्वाच्या ‘अग्नी’ क्षेपणास्त्राच्या अद्ययावत आवृत्तीची यशस्वी चाचणी केली. या क्षेपणास्त्रातून एकाच वेळी अनेक अण्वस्त्र नेता येतात तसेच त्यातून एकाच वेळी अनेक लक्ष्यांवर हल्ला करता येतो. हिंदुस्थानच्या हवाई सुरक्षा तसेच मारक क्षमता यामुळे आणखी भक्कम झाली आहे.
‘डीआरडीओ’ने दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी ओडिशातील ए. पी. जे. अब्दुल कलाम क्षेपणास्त्र चाचणी केंद्रातून ही चाचणी करण्यात आली. नव्या ‘अग्नी’मध्ये ‘मल्टिपल इंडिपेंडेंटली टार्गेटेड री-एंट्री व्हेईकल’ (एमआयआरव्ही) यंत्रणा बसविण्यात आली आहे. यामुळे एकाचवेळी अनेक अण्वस्त्र नेणे तसेच अनेक लक्ष्यांवर निशाणा साधता येणार आहे. चाचणीसाठी हिंद महासागरात विविध ठिकाणी लक्ष्य ठेवण्यात आली होती. ‘अग्नी’ने ती सर्व यशस्वीरीत्या भेदली.
सात हजार किलोमीटरपर्यंत मारक क्षमता
आज चाचणी केलेले ‘अग्नी’ क्षेपणास्त्र हे देशाचे दुसरे आंतरखंडीय बॅलिस्टिक क्षेपणास्त्र आहे. याचा मारक क्षमता पाच ते सात हजार किलोमीटरपर्यंत आहे. या क्षेपणास्त्राचा वेग एवढा प्रचंड आहे की, शत्रूचे रडार आणि क्षेपणास्त्र संरक्षण यंत्रणेला ते रोखणे जवळपास अशक्य आहे.



























































