
दिंडोशीतील रहेजा हाईट्स या सोसायटीच्या पार्किंगमध्ये शुक्रवारी मध्यरात्री दोन वाजण्याच्या सुमारास बिबट्याने शिरकाव केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. एकाच महिन्यात तिसऱ्यांदा सोसायटीच्या आवारात बिबट्याचा वावर आढळल्यामुळे रहिवाशांमध्ये घबराट पसरली आहे.
संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात बिबटय़ांचा अधिवास असला तरी त्यांचा उपद्रव अलीकडे थांबला होता. परंतु आता पुन्हा एकदा दिंडोशीतील रहेजा हाईट्स सोसायटीमध्ये बिबट्याचा संचार सुरू असल्याचे उघडकीस आले आहे. शुक्रवारी मध्यरात्री बिबट्या मुक्तपणे सोसायटीच्या पार्किंगमध्ये संचार करताना पाहायला मिळाला. सोसायटीच्या सीसीटीव्हीत ही घटना कैद झाली आहे. वन विभागाने तातडीने कारवाई करून बिबट्याला जेरबंद करावे, अशी मागणी रहिवाशांकडून जोर धरू लागली आहे.



























































