
मध्य रेल्वेवर विस्कळीत वेळापत्रकाबरोबर विविध कामांसाठी सातत्याने ‘ब्लॉक’ची मालिका सुरू राहिली आहे. विद्याविहार स्थानकातील इंटरमीडिएट फूटओव्हर ब्रिजच्या गर्डर लाँचिंगसाठी शुक्रवारपासून सलग तीन रात्री विशेष वाहतूक व पॉवर ब्लॉक घेतला जाणार आहे. ब्लॉकच्या अवधीत काही लोकल फेऱया रद्द करण्यात येणार असल्यामुळे मध्य रेल्वेच्या प्रवाशांचे ‘दिवस-रात्र’ हाल होणार आहेत.
मध्य रेल्वे प्रशासनाने बुधवारी ब्लॉकचे वेळापत्रक जाहीर केले. त्यानुसार शुक्रवारी मध्यरात्री 1.15 ते पहाटे 4.15 पर्यंत, शनिवारी रात्री 12.10 ते पहाटे 4.40 पर्यंत आणि रविवारी मध्यरात्री 1.15 ते पहाटे 3.05 पर्यंत विशेष ब्लॉक घेतला जाईल. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) येथून रात्री 11.30 ते 12.12 वाजेपर्यंत कर्जतच्या दिशेने जाणाऱया धिम्या गाडय़ा माटुंगा ते मुलुंड स्थानकांदरम्यान जलद मार्गावर वळवण्यात येतील. कसाऱयाहून रात्री 10 वाजल्यापासून सीएसएमटीच्या दिशेने येणाऱया लोकल ट्रेन मुलुंड ते माटुंगा स्थानकांदरम्यान जलद मार्गावर वळवण्यात येणार आहेत. सीएसएमटीहून सुटलेल्या काही गाडय़ांचा प्रवास पुर्ला येथे, तर अप दिशेने येणाऱया काही गाडय़ांचा प्रवास ठाणे येथे समाप्त केला जाणार आहे. तीन दिवसांच्या ब्लॉक काळात लोकल सेवा कोलमडणार असल्याने नोकरदारांची घरी परतताना गैरसोय होणार आहे. ठाणे येथून रात्री 11.40 वाजता सुटणारी ठाणे-पुर्ला लोकल तसेच पहाटे 4.04 वाजता सुटणारी ठाणे-सीएसएमटी लोकल ट्रेन रद्द केली जाणार आहे. सीएसएमटीहून रात्री 11.38 आणि 12.24 मिनिटांनी सुटणारी सीएसएमटी-ठाणे लोकल ट्रेन रद्द हेणार आहे.
पश्चिम रेल्वेवर उद्या रात्री पाच तासांचा ब्लॉक
दादर स्थानकातील अभियांत्रिकी कामांसाठी पश्चिम रेल्वेवर शुक्रवारी रात्री 12 ते पहाटे 5 वाजेपर्यंत ब्लॉक घेण्यात येणार आहे. ब्लॉक काळात मुंबई सेंट्रल ते माहीम स्थानकांदरम्यान धीम्या लोकल जलद मार्गांवरून चालवल्या जातील. त्या लोकल महालक्ष्मी, लोअर परळ, प्रभादेवी आणि माटुंगा रोड स्थानकांवर थांबणार नाहीत. 21 लोकल फेऱया रद्द करण्यात येणार आहेत.






























































