मराठा आरक्षणासाठी जरांगेंचे 30 मेपासून उपोषण

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

देवेंद्र फडणवीसांना मुख्यमंत्री मराठ्यांनीच बनवले आहे, पण फडणवीसांना मराठ्यांचा एवढा द्वेष का आहे हे कळत नाही. सरकारला मराठ्यांचे कल्याण करण्याची संधी होती, परंतु ती त्यांनी घालवली आहे. आता माघार नाही. 30 मेपासून आंतरवालीत पुन्हा मराठा आरक्षणासाठी एल्गार होणार असून, त्यासाठी 3 कोटी मराठे येणार असल्याचा दावा मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे यांनी केला.

मराठा आरक्षणासंदर्भात मनोज जरांगे यांनी आंतरवाली सराटी येथे समाजबांधवांशी चर्चा करून आज आंदोलनाची घोषणा केली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे राज्याचे प्रमुख आहेत, त्यामुळे आम्ही त्यांनाच जाब विचारणार, असे जरांगे म्हणाले. एकनाथ शिंदे यांनी कुणबी प्रमाणपत्र देण्यासाठी शिबिरे घेतली होती. फडणवीसांनी असेच करायला काय हरकत आहे, असेही जरांगे म्हणाले. सामाजिक कल्याण मंत्री संजय शिरसाट आणि आमदार धनंजय मुंडे यांच्यावर मनोज जरांगे यांनी यावेळी शेलक्या भाषेत टीका केली.

अशा आहेत मागण्या

  • मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र देऊन ओबीसी प्रवर्गात समाविष्ट करा.
  • हैदराबाद गॅझेटची अंमलबजावणी करा, 29 मेपर्यंत प्रमाणपत्र द्या.
  • सगेसोयऱ्यांना कुणबी प्रमाणपत्र देण्याचा अध्यादेश काढा.
  • सातारा, कोल्हापूर, औंध, मिरज संस्थानचे गॅझेट लागू करा.
  • मराठा आरक्षणासाठी बलिदान देणाऱया कुटुंबाला नोकरी.